भ्रष्टाचाराला कंटाळलो; गाव विकत घेता का? सुविधांची वानवा, योजना कागदोपत्रीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 05:55 AM2023-12-24T05:55:01+5:302023-12-24T05:56:21+5:30
अजून पैसे कमी पडत असतील तर खडकवाडी विकून ग्रामपंचायतीला पैसे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अजय जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटोदा (जि. बीड) ( Marathi News ): तालुक्यातील खडकवाडी येथील ग्रामस्थांनी विकास योजनांमधील भ्रष्टाचाराला कंटाळून ‘गाव विकणे आहे’ असा फलक गावात लावला. गाव विक्रीला काढल्याची कल्पना मात्र प्रशासनाला अद्यापही नाही.
खडकवाडी येथे सिमेंट रस्त्याच्या कामासाठी २०२२ मध्ये ४ लाख ९० हजार रुपये निधी मंजूर झाला होता. परंतु, सरपंच व सरपंच पती यांनी ग्रामसेवकावर राजकीय दबाव टाकत, शिवीगाळ करत सिमेंट रस्ता न करता अपहार केला आहे. अजून पैसे कमी पडत असतील तर खडकवाडी विकून ग्रामपंचायतीला पैसे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गावातील राजकारणामुळे असे फलक लावण्यात आल्याचे ग्रामस्थ भीमराव सानप यांनी सांगितले.
ग्रामपंचायतच्या विकासासाठी आलेले पैसे सरपंचाला पुरत नाहीत. त्यामुळे गाव विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही गाव विकण्यासाठी काढले आहे. - ज्ञानदेव लोंढे, ग्रा.पं. सदस्य.