विनायक मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? ज्योती मेटे म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:54 PM2022-08-22T17:54:03+5:302022-08-22T17:55:14+5:30
शिवसंग्राम परिवाराला उघडे पडू देणार नाही, अशी ग्वाही मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली
बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या माजी आमदार विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू होणे हे दुर्दैवच आहे. यामुळे एक लढवय्या नेता समाजाने आणि महाराष्ट्राने गमावला आहे. पेंटर ते आमदार असा संघर्षमय प्रवास असलेल्या मेटेंनी स्थापन केलेली शिवसंग्राम संघटना पोरकी झाली आहे. परंतु आपण जरी शासकीय सेवेत असलो तरी माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढा आधार देईल. शिवसंग्राम परिवाराला उघडे पडू देणार नाही, अशी ग्वाही मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे. त्यामुळे ही लढाई ज्योती मेटे पूर्ण करतील, अशी अपेक्षाही समाजबांधवांना आहे.
सामान्य कुटुंबातील विनायक मेटे यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. केज तालुक्यातील राजेगावसारख्या छोट्या गावातील मेटे यांचा जीवन प्रवास संघर्षाचा राहिला आहे. परिस्थितीमुळे त्यांनी एक रुपया मजुरीवर पेंटर म्हणून काम केले. परंतु अभ्यास, संयम आणि वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी १९८६ सालापासून मराठा महासंघात स्थान मिळविले. सुरुवातीला कार्यकर्ता आणि नंतर पदाधिकारी असा प्रवास असलेल्या मेटेंच्या गळ्यात १९९६ साली पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. तेव्हापासून आतापर्यंत सलग पाच वेळा ते आमदार राहिले.
दरम्यान, मेटे यांनी दि. ६ जानेवारी २००२ साली शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. अवघ्या काही दिवसांत त्यांनी राज्यभर जाळे तयार करून राजकीय पक्षांचा घटक पक्ष म्हणून दबदबा निर्माण केला. राज्यात दोन आमदारही निवडून आणले. संघटना बहरत असतानाच दि. १४ ऑगस्टची पहाट त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळी ठरली. मुंबईला जाताना त्यांचे अपघाती निधन झाले आणि सर्व शिवसंग्राम परिवार पोरका झाला. आता कार्यकर्ते आणि कुटुंब या दु:खातून सावरायला वेळ लागणार आहे. परंतु मेटे यांनी सुरू केलेली मराठा आरक्षणाची लढाई पुढे कोण नेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मेटे यांच्या पत्नी ज्याेती मेटे यांनी आपण शिवसंग्रामला आणि कार्यकर्त्यांना उघडं पडू देणार नाहीत. मी शासकीय सेवेत असल्याने माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करेल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना काहीसा धीर मिळाला आहे.
दोन्ही मुले राजकारणापासून दूर
विनायक मेटे यांना आशुतोष आणि आकांक्षा अशी दोन मुले आहेत. आशुतोष पुण्यात पदवीचे, तर आकांक्षा या दिल्लीत शिक्षण घेत आहेत. हे दोघेही आतापर्यंत कधीच राजकारणात सक्रिय दिसले नाहीत. सण, उत्सवाच्या वेळीच ते बीडला येत होते, असे सांगण्यात आले. हे दोन्ही मुले राजकारणापासून दूर असल्याने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची शक्यता कमी वाटते, असे दिसते.
बंधू रामहरी मेटेंवर जबाबदारी?
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेत सक्रिय राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. संघटना की नोकरी? असे दोन पर्याय त्यांच्यासमाेर असणार आहेत. जर ज्योती मेटे यांनी पहिल्याप्रमाणेच नोकरी केली तर ही जबाबदारी विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याकडे दिली जाऊ शकते. ते सध्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. सध्या तरी मेटे कुटुंब आणि शिवसंग्राम परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. परंतु मेटे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणाला तरी पुढे येऊन आणखी ताकद निर्माण करावी लागणार आहे, हेदेखील तितकेच खरे आहे.