तंबाखू कार्यक्रमातही घोळ; कार्यालयात बसूनच दाखविले दौरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:38+5:302021-09-21T04:37:38+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातही मोठा घोळ असल्याचा संशय आहे. याबाबत वारंवार माहिती मागितल्यानंतरही आणि जिल्हा शल्य ...
बीड : जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातही मोठा घोळ असल्याचा संशय आहे. याबाबत वारंवार माहिती मागितल्यानंतरही आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगूनही येथील विभागप्रमुख नागनाथ भडकुंभे व पथक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कार्यालयात बसून दाखविलेल्या दौऱ्यांचा पर्दाफाश होऊ नये, याच भीतीने माहिती लपविली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालयात सामान्यांच्या आरोग्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध विभाग आहेत. त्यातीलच तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा विभागही आहे. येथे तीन ते चार कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु त्यांच्याकडून कार्यक्रम घेण्याच्या नावाखाली दाखविलेले दौरे कार्यालयातच बसूनच कागदावर लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागाचे प्रमुख नागनाथ भडकुंभे यांना चार वेळा माहिती विचारली. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांना संपर्क करून दिल्यावर त्यांनी माहिती देण्याच्या सूचना केल्या. परंतु त्यांनी तरीही माहिती दिली नाही. यावरून येथे मोठा घोळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सीएस डॉ. साबळे यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचेही यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. आता ही सर्व माहिती अधिकारातून मागविली जाणार असल्याचे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
---
गरिबांवर कारवाया, डॉक्टरांना मोकळीक
जिल्हा रुग्णालयात येणारा वर्ग सामान्य आहे. त्यांच्याकडे तंबाखू, गुटखा पुडी सापडली तर हा विभाग २०० ते ५०० रुपये दंड वसूल करतो. या कारवाया चांगल्याच आहेत. परंतु त्यात दुजाभाव केला जात आहे. काही डॉक्टर, कर्मचारी कार्यालयात, दवाखान्यात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. परंतु त्यांच्यावर हा विभाग मेहरबान आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम तंबाखू नियंत्रण विभाग आणि येथील कर्मचारी करत असल्याचे दिसत आहे.
--
काय म्हणतात, मुजोर कर्मचारी
तंबाखू नियंत्रण विभागात नवीनच रूजू झालेले नागनाथ भडकुंभे यांना प्रमुख केले. याच कर्मचाऱ्याने सीएसला विचारतो, त्यांनी सांगितले माहिती देऊ नका, बरं मी बघतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा... अशी अनेक उडावाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. विशेष म्हणजे याच कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी घरी बसून कोरोना वॉर्डातील रिपोर्टींग केल्यामुळे नोटीस बजावली होती. यावरून या कर्मचाऱ्याची पार्श्वभूमीच मुजोर असल्याचे सांगण्यात येत आहे.
----