आज परळीत ठरणार आंदोलनाची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:17 AM2018-08-02T00:17:32+5:302018-08-02T00:18:18+5:30
गुरूवारी परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा व मेगा भरती रद्द करा या मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने १५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरुच आहे. बुधवारी अंबाजोगाई येथे या मागणीसाठी जेल भरो तर माजलगाव येथे तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान गुरूवारी परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच परळीतील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली, मोर्चे काढण्यात आले. केज तालुक्यातील विडा येथे एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती, तर सोशल मीडियावर इशारा व धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाºया संबंधितांवर पोलिसांनी नजर ठेवत कारवाई केली. जिल्हाभरात पोलीस यंत्रणा दक्ष राहिल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाहीत. गुरुवारी आंदोलनाची दिशा स्पष्ट होईल.परळी येथील तहसील कार्यालयासमोर गुरूवारी सकाळी ११ वाजता वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य समन्वयकांची बैठक आयोजित केली आहे,. या बैठकीत ठोक मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे राज्य समन्वक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
आश्वासन पाळले नाही, म्हणून आंदोलन
परळी: मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळले जात नसल्यामुळेच आंदोलन होत असल्याचा आरोप किसान सभेचे सरचिटणीस कॉ. अजीत नवले यांनी केला.
बुधवारी परळी येथे त्यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. परळी वैजनाथ येथून अनेक क्रांतिकारी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.
परळीत चालू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला आम्ही किसान सभेच्या वतीने पाठिंंबा देत असून, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी असल्याचे अजित नवले म्हणाले.
आयुक्तांची परळीत पुन्हा भेट
परळी : बुधवारी परळीत होणारे जेल भरो आंदोलन झाले नाही. औरंगाबाद चे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर बुधवारी परळीत आले होते. मात्र सायंकाळपर्यंत तपशील समजू शकला नाही.
गुन्हे मागे घेण्यासाठी तहसीलसमोर ठिय्या
माजलगाव : राज्यात मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा आमच्या सर्वांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी राजेंद्र होके, रामचंद्र डोईजड, लखन सावंत, गणेश राजवन, राजेभाऊ शेजुळ, दीपक घुबडे, राम लोळगे, गुलाबराव मोरे, रवी सोळंके, गोवर्धन लाखे, मोरे, गजानन जाधव, रमेश आगे रमेश यादव, उमेश जाधव, गोरख भोसले, दत्ता कोरे, हनुमान जाधव आदी सहभागी झाले होते.
अंबाजागाईत जेल भरो
अंबाजोगाई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत बुधवारी अंबाजोगाईत जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी २५ आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
सकाळी ११ वाजता शेकडो तरूणांनी बसस्थानकासमोरच ठिय्या दिला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी अॅड. माधव जाधव, प्रशांत आदनाक, प्रशांत सुभाषराव शिंदे, नेताजी साळुंके, योगेश कडबाने, दिग्विजय भास्करराव लोमटे, प्रशांत गोपीनाथ शिंदे, गणेश मोरे, प्रवीण गंगणे, राणाप्रताप चव्हाण, महेश कदम, अमोल लोमटे, अजय पवार, भीमसेन लोमटे, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पतंगे, राहुल लोमटे, सुधाकर कचरे, नीलेश जाधव, मेघराज जोगदंड, लकी जगदाळे, प्रवीण मोरे, गोविंद पोतंगले, विजयकुमार गंगणे यांना ताब्यात घेत त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सोडून देण्यात आले.