आज चौथा श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची उत्स्फूर्त गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:19 PM2024-08-26T16:19:14+5:302024-08-26T16:23:20+5:30
राज्यातील भविकांसह गुजरात, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन
- संजय खाकरे
परळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व चौथा श्रावण सोमवार असल्याने गेल्या तीन श्रावण सोमवार पेक्षा आजची गर्दी अधिक होती. शिवामूठ जवस व बिल्वपत्र अर्पण करून श्री श्री वैद्यनाथाचे महिला भाविकांनी दर्शन घेतले. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आंध्र प्रदेश व इतर राज्यातील भाविक श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन समाधान वाटले असल्याची भावना बिहार, कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांनी व्यक्त केली आहे.
चौथा श्रावण सोमवारचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री बारानंतर शिवभक्तांची श्री वैद्यनाथ मंदिरात रांग लागली. महिला पुरुष व पासधारक अशा तीन स्वतंत्र रांगा लावण्यात आल्याने हजारो भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले आहे. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. मंदिरात दर्शन करून बाहेर पडणाऱ्या दरवाजावर पोलिसांचा खडा पहारा होता त्यामुळे आऊट गेट नी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आळा बसला. धर्मदर्शन रांगेत चार तास थांबावे लागले व थांबून दर्शन घेतले, असे श्रीदेवी सदानंद चौधरी यांनी सांगितले.
चौथ्या श्रावण सोमवारी परळीचे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परराज्यातील भाविकांनी गजबजले... #shravanmaas#beednewspic.twitter.com/uiEbTNXa5D
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 26, 2024
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी परळीचे श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग एक असून या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन समाधान वाटले अशी प्रतिक्रिया बिहारचे भाविक राजू रंजन व दिलीप कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. या श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार आलेले आहेत. पाचव्या सोमवारी पोळा सण असल्याने आज चौथ्या श्रावण सोमवारी श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. परंतु, वेळ लागला पण दर्शन मनोभावे करता आले, असे पूर्णा तालुक्यातील पिंपरन येथील तातेराव भंडारे व पुरभाजी सोनटक्के यांनी सांगितले.
चौथ्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची संख्या अधिक आल्याने प्रसाद साहित्य खरेदी चांगल्या प्रमाणात झाली असे प्रसाद साहित्याची विक्रेते विवेकानंद राघू यांनी सांगितले. कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवारी भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी व पाणी पाउच वाटप करणे सुरू केले आहे. या सोमवारी भाविकांची संख्या जास्त असल्याने सात क्विंटल साबुदाणा खिचडी तयार केली आहे, अशी माहिती नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली. वैद्यनाथ मंदिर जवळील प्रति वैद्यनाथ मंदिर व पंचमुखी महादेव मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. तसेच जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
गुजरातहून आले भाविक
भारत गौरव टुरिझम ट्रेनने परळी शहरात आज गुजरात येथील 400 भाविकांचे आगमन झाले . गुजरात मधील गोंडल , सुरेंद्रनगर बडोदा ,राजकोट मधील सर्व भाविकांनी चौथ्या श्रावण सोमवारी दुपारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. भारत गौरव टुरिझम रेल्वेने सात ज्योतिर्लिंग करण्यात येणार असून 20 ऑगस्ट रोजी ही रेल्वे ज्योतिर्लिंग यात्रेवर निघाली आहे .आतापर्यंत या भाविकांनी महाकाल, ओंकारेश्वर, त्रिंबकेश्वर, भीमाशंकर ,घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असून 26 ऑगस्ट रोजी परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे 400 भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले .तसेच औंढा नागनाथ .श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यात येणार असल्याचे भाविकांनी सांगितले