बीडमध्ये कोरोना लस घेण्यासाठी लाभार्थींसाठी 'टोकन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:30+5:302021-02-24T04:34:30+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्राला सोमवारी यात्रेचे स्वरूप आले होते. काेरोना नियम पायदळी तुडवून गर्दी केल्याचा ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्राला सोमवारी यात्रेचे स्वरूप आले होते. काेरोना नियम पायदळी तुडवून गर्दी केल्याचा प्रकार 'लोकतम'ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाची चांगलीच कानउघडणी केली. मंगळवारी सकाळीच जिल्हा शल्य चिकित्सकांनी केंद्राला भेट देत नियोजनाचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना केल्या. तसेच आता यापुढे टोकन पद्धत सुरू करून लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीला प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी ८ जानेवारीला रंगीत तालीम घेण्यात आली होती. यात उत्कृष्ट नियोजन असल्याचा देखावा आरोग्य विभागाने केला होता. सुरुवातीचे काही दिवस नियोजनबद्ध लसीकरण झाले; परंतु सोमवारी चक्क येथे लाभार्थींच्या गर्दीने केंद्राला यात्रेचे स्वरूप आले होते. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटाईज व इतर कोरोना नियम पायदळी तुडविल्याचे दिसले. हाच सर्व प्रकार 'लोकमत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. अधिकाऱ्यांनी सूचना करताच मंगळवारी सकाळीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते केंद्रस्थळी दाखल झाले. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क आदी नियमांचे पालन करण्यासह इतर सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत भूलतज्ज्ञ डॉ. पारस मंडलेचा हे होते.
टोकन घेतले तरच लस
सोमवारची गर्दी पाहून मुख्य प्रवेशद्वारावरच लाभार्थींना टोकन देऊन केंद्रात सोडले जात आहे. टोकनवरील क्रमांकाप्रमाणेच लस दिली जात होती. कोणीही मध्येच लस घेणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही डॉ.गिते यांनी केल्या.
कोट
कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी यापुढे घेतली जाईल. थोड्याफार चुका होत असल्या तरी त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाभार्थींनीही शिस्तीत व शांततेत लस घ्यावी. एकाचवेळी गर्दी न करता ठरावीक अंतराने लस घ्यावी.
डॉ. संजय कदम
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण मोहीम, बीड