फास्टॅग लावूनही उशीर; वाहनधारकांना मन:स्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:41 AM2019-12-16T00:41:20+5:302019-12-16T00:41:41+5:30
टोलनाक्यावरची गर्दी लवकर कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात फास्टॅगसंबधी तांत्रिक अडचणी येत असल्याने टोल साठी उशीर होतो
विष्णू गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : टोलनाक्यावरची गर्दी लवकर कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात फास्टॅगसंबधी तांत्रिक अडचणी येत असल्याने टोल साठी उशीर होतो. यामुळे वाहनधारकांना मन:स्ताप होत आहे. वॉलेटमध्ये शिल्लक रक्कम नसल्याने टोलनाक्यावर वादही होत आहेत.
१५ डिसेंबरपासून टोल नाक्यावरून जाताना वाहनांना फास्टॅग बंधनकारक आहे. नागरिकांमध्ये पुरेशी जागृती व तांत्रिक महिती नसल्याने टोल नाक्यावर वाद होत आहेत. सरकारच्या आवाहनावरून अनेकांनी वाहनांवर फास्टॅग लावले. प्रत्यक्ष वाहन टोल नाक्यावर आले असता टोलचे पैसे वॉलेटमधून वजा होत नाहीत. सदरील पैसे वजा न झाल्याने टोल नाक्यावर वाहने तशीच थांबलेली असतात. त्यानंतर त्यांना टोल नाक्यावरील बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे धाव घ्यावी लागते. कागदांची पूर्तता करणे, लॉगीन आयडी- पासवर्ड ओटीपी जनरेट करणे, वॉलेटमध्ये पैसे जमा करणे यासाठी वाहनधारकांना थांबावे लागत आहे. सर्व्हर व्यवस्थित चालत असेल तर ठीक. नाहीतर दोन मिनिटाच्या कामासाठी अर्धा तास देखील लागतो. टोलनाक्यावरील असलेल्या आरएफआयडी (रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन) रिडर स्कॅनरमधून काही वाहनांवरील फास्टॅग स्कॅन होत नसल्याने अङचणी निर्माण होत आहेत.
याला पर्याय म्हणून पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर हँड स्कॅनर घेऊन एका कर्मचा-यास उभा करण्यात आले आहे. हा कर्मचारी स्कॅनर हातात घेऊन गाडीवरील फास्टॅग स्कॅन करीत आहे. वाहनधारकांच्या वॉलेटमधून पैसे वजा झाल्याची खात्री पटल्यानंतर वाहनाला पुढे जाण्याची संमती दिली जात आहे. यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जात आहे. या तांत्रिक अडचणींवर पर्याय शोधण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
वाहतूक कोंडीबद्दलटोलनाका व्यवस्थापन गप्प
पाडळसिंगी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी का होते याबाबत टोल नाका व्यवस्थापकांशी संवाद साधला.
व्यवस्थापक एम. एम. तुपारे म्हणाले, सध्या ३० टक्के वाहनचालकांनी फास्टॅग घेतला असून, ७० टक्के वाहनचालकांकडे फास्टॅग नसल्याचे दिसून आले.
या टोलनाक्यावर एकूण १२ लेन असून दररोज १० ते १२ हजारांपेक्षा जास्त वाहने या रस्त्यावरून ये -जा करीत असल्याचे सांगत वाहतूक कोंडीबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
१५ डिसेंबर पासून दुप्पट दंड भरणा सुरू
वाहनधारकाने वाहनावर फास्टॅग लावण्यासोबतच फास्टटॅगच्या वॉलेटमध्ये योग्य शिल्लक रक्कम ठवणे गरजेचे आहे.
वॉलेटमध्ये योग्य शिल्लक पैसे नसताना फास्टॅगच्या लेनमध्ये वाहन आल्यास वाहनधारकांना टोलच्या दुप्पट दंड भरावा लागत आहे. हा नियम १५ डिसेंबर पासून लागू करण्यात आला आहे.
वाहनधारकांना वॉलेटमध्ये योग्य शिल्लक ठेवावी लागणार आहे. फास्टॅग नसताना फास्टॅगच्या लेनमध्ये वाहन नेल्यास टोलच्या दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
वॉलेटमध्ये योग्य शिल्लक नसल्यास रोख टोल देण्यासाठी उपलब्ध असलेल्या लेनचा वापर करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.