मरण यातना संपणार ! आठवड्यात 'त्या' २० किलोमीटरवरील खड्डे बुजवणार, नितीन गडकरींचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 12:31 PM2021-10-14T12:31:14+5:302021-10-14T12:34:06+5:30
Nitin Gadkari News साबलखेड ते चिंचपूर असा २० किलोमीटरचा रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत.
कडा ( बीड ) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ वर वीस किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. याची दखल केंद्रिय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी घेतली असून आठ दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली होती.
बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५६१ हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे. याच महामार्गावरून हैदराबाद, कर्नाटक राज्यातून येणारे प्रवासी, यात्रेकरू मोठ्या संख्येने प्रवास करतात. शनि शिंगणापुर, शिर्डी देवस्थाकडे हा मार्ग जातो. मात्र हा मार्ग अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात घडतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर -कडा- जामखेड- बीड या महामार्गाच्या दुरूती व मजबुतीकरणाचे काम केले आहे. मात्र, साबलखेड ते चिंचपूर असा २० किलोमीटरचा रस्त्याचे काम करण्यात आले नाही.
संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने या २० किलोमीटर दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी नागपूर येथे केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय त्यांनी गडकरी यांच्यासमोर मांडला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लागलीच सबंधित अधिकाऱ्यांना सुचना देत आठ दिवसात या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन दिले.
मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी