लग्नाचे आमिष दाखवून परित्यक्ता महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:39 AM2019-04-23T00:39:34+5:302019-04-23T00:40:08+5:30
एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.
केज : एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
६ वर्षांपूर्वी वषार्पूर्वी सदर पीडितेला दोन मुले झाल्यानंतर पतीने सोडून दिले होते. ती आपल्या माहेरी राहत असताना डिसेंबर २०१३ मध्ये खुदुस अब्दुल वहाब इनामदार (रा. रोजा मोहल्ला, केज) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तिने सतत लग्नासाठी तगदा लावला. मात्र आरोपीने नंतर लग्न करू असे म्हणून वेळ मारून नेली.पाच वर्षांपासून सतत जबरदस्तीने होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिला ही १७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता खुदूस इनामदार याच्या घरी गेली. तिने लग्न कधी करणार आहेस, अशी विचारणा करताच आरोपीचे नातेवाईक अब्दुल रहेमान अब्दुल वहाब इनामदार, अब्दुल्ला उर्फ अब्दुल वहाब इनामदार, करिमोद्दीन अब्दुल वहाब इनामदार, राजू अब्दुल वहाब इनामदार यांनी पीडितेच्या चारित्र्याबाबत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू पुन्हा लग्न कर म्हणून आमच्या घरी आलीस तर तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकू अशी धमकी देऊन पीडितेस हाकलून दिले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून वरील सर्वांविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपी फरार आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करीत आहेत.