दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:27+5:302021-02-17T04:40:27+5:30
बीड : अवघ्या सात आणि आठ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर घराशेजारी रहाणाऱ्या २४ वर्षीय नराधमाने चाकूचा धाक दाखवत त्यांचे हातपाय ...
बीड : अवघ्या सात आणि आठ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर घराशेजारी रहाणाऱ्या २४ वर्षीय नराधमाने चाकूचा धाक दाखवत त्यांचे हातपाय बांधून अत्याचार केला. परळी तालुक्यात झालेल्या या अत्याचाराला पंधरा दिवसांनंतर वाचा फुटली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लातूर जिल्ह्यातील मुरुड येथून अटक केली आहे.
विकास नारायण कांदे (वय २४) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत बालिकेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांची आठ वर्षीय मुलगी आणि सात वर्षीय भाची या दोघी पंधरा दिवसांपूर्वी विकास कांदे याच्या घरी ताक आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी विकासच्या घरात कोणीही नव्हते. याचा गैरफायदा घेत विकासने त्या दोघींना एका खोलीत नेले. दोघींच्या गळ्याला भाजी कापण्याचा चाकू लावून त्याने त्यांचे हातपाय बांधले आणि कुकर्म केले. त्यानंतर त्याने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला माहिती सांगितल्यास मारून जंगलात फेकून देईन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलींनी मौन बाळगले. अखेर असहाय्य झाल्याने १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी आईला घडलेला प्रकार सांगितला. सदर फिर्यादीवरून विकास कांदे याच्यावर अत्याचारप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि श्रीकांत डोंगरे करत आहेत.
मुरुडमधून घेतले ताब्यात
घडलेल्या घटनेची माहिती मुलींच्या घरी कळाल्याचा सुगावा लागताच विकास कांदे याने त्याठिकाणावरून पळ काढला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांनी त्याला लातूर जिल्ह्यातील मुरूड येथू मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. ही कारवाई अंमलदार विष्णू फड, अर्शद सय्यद यांनी केली.