मूकबधिर तरुणीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:14 AM2019-04-17T00:14:44+5:302019-04-17T00:15:46+5:30
मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी मंगळवारी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.
बीड : मूकबधिर तरुणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी मंगळवारी दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. शिरुर तालुक्यात २०१६ मध्ये हे प्रकरण घडले होते. पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणास वाचा फुटली होती.
शिरुर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी जन्मापासून मूकबधिर आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. पीडित तरुणीकडे कुटुंबियांनी चौकशी केल्यानंतर तिने हातवारे करुन संपूर्ण हकीकत सांगितली. फेट्यावाल्याच्या मुलाने आपल्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने खाणाखुणा करुन सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना आरोपीची खात्री पटली. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरुन १६ नोव्हेंबर २०१६ रोजी गावातीलच हनुमंत विठोबा बांगर (२६) याच्याविरुध्द गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. तो विवाहित असून त्यास एक मुलगा आहे.
शिरुर ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक तानाजी दराडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन हनुमंत बांगरला बेड्या ठोकल्या. तपास करुन दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्या. बी.व्ही. वाघ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी काम पाहिले.
पीडितेची सोनोग्राफी करणारे डॉक्टर, ती मूकबधिर असल्याचा निर्वाळा देणारे डॉक्टर, तपास अधिकारी, तिचे नातेवाईक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी न्यायवैद्यक चाचणी अहवाल तसेच दुभाषकामार्फत पीडितेची साक्ष नोंदवून केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्या. वाघ यांनी आरोपी हनुमंत विठोबा बांगर यास कलम ३७६ अन्वये १० वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच बलात्कार करताना पीडितेचा गळा आवळून मारहाण केल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली. अॅड. अनिल तिडके यांना पैरवी अधिकारी फौजदार राजकुमार मोरे यांचे सहाय्य लाभले.
पीडितेचा भाऊच फितूर
या प्रकरणात सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी १५ साक्षीदार तपासले. पीडितेचा भाऊ फिर्यादी होता. तो फितूर झाला. मात्र, साक्षी, पुरावे तसेच पीडितेचा दुभाषकामार्फत नोंदविलेला जवाब यामुळे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविता आले.