सहा लाख खर्चूनही बीडमध्ये गणेशभक्तांचा खडतर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:47+5:302021-09-21T04:37:47+5:30
बीड : शहरात गणेश विसर्जन स्थळी जाणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी जवळपास सहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; परंतु ...
बीड : शहरात गणेश विसर्जन स्थळी जाणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यासाठी जवळपास सहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; परंतु तरीही गणेशभक्तांना खडतर प्रवास करावा लागला. केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठीच हे कंत्राट काढल्याचा आरोप केला जात असून, यात मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांचा ‘हातभार’ असल्याचा संशय आहे. याची चौकशी करण्याची मागणी सामान्य बीडकरांमधून केली जात आहे.
यावर्षी कोरोनामुळे गणेश मिरवणुकीला बंदी होती. साध्या पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यासाठी बीड शहरात खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील बारव आणि ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराजवळील विहिरीत व्यवस्था करण्यात आली होती. या स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने सहा लाख रुपये खर्च केले; परंतु तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ होते. खड्डे न बुजविताच निधी अदा केल्याचा संशय केला जात आहे. यात पालिका मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्याबद्दल तीव्र रोष असून गणेशभक्त आंदोलनाच्या तयारीत आहेत. डॉ. गुट्टेंची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
---
शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था केली. या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी खर्च झाला.
डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न.प., बीड