पोलीस अधीक्षक कार्यालयात व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; गुजर गँगविरुद्ध कारवाईची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:49 PM2019-09-20T12:49:25+5:302019-09-20T12:59:46+5:30
गुजर खान गँगने १ कोटीची मागितली होती खंडणी
बीड : गुजर खान गँगपासून धोका असून त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एका भंगार व्यापाऱ्याने शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शिक्षक सय्यद साजेद अली खून प्रकरणात सुद्धा गुजर खान गँगकडे संशयाची सुई आहे.
खंडणीखोरांचा बळी ठरले शिक्षक साजेद https://t.co/OOw2VepWdx
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 20, 2019
बालेपीर येथील शिक्षक सय्यद साजेदअली मिर अनसारली यांची गुरुवारी दिवसाढवळया धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुज्जर खान गँगवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी बालेपीर येथील एक भंगार व्यापारी कौसर मोमीन यांना गुज्जर खान गँगने 1 कोटींची खंडणी मागितली होती. त्यांनी देखील बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यांनतर त्यांच्या घरावर दगडफेक करून पेट्रोल टाकून जाळपोळ देखील करण्यात आली होती याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर देखील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही म्हणून सय्यद अली यांचा खून झाला. आमच्या जीवितास धोका असल्याचे कौसर मोमीन यांनी यावेळी सांगितले . खून झालेले सय्यद साजेदअली मिर अन्सारअली यांनी आपल्या व कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याच्या वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.
काही आरोपी ताब्यात
आत्मदहन प्रकरणानंतर कौसर मोमीन व इतर नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक भास्कर सावंत व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शिवलाल पुरभे यांच्याशी चर्चा केली, दरम्यान य प्रकरणातील काही आरोपी ताब्यात घेतले असून, जोरपर्यंत मुख्य आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व दरोडाप्रतिबंदक पथक तसेच इतर पथके आरोपीच्या शोधात रवाना झाले आहेत लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेऊ अशी माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली आहे.