अँटिजेन टेस्टसाठी व्यापाऱ्यांची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:46+5:302021-03-15T04:29:46+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शासनाच्या वतीने अँटिजेन टेस्ट करण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. तीन ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शासनाच्या वतीने अँटिजेन टेस्ट करण्यासाठी व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे. तीन दिवस झालेल्या अँटिजेन टेस्टमध्ये शासनाला ३१९४ जणांची टेस्ट होणे अपेक्षित होते. मात्र, यातील निम्म्याही टेस्ट न होता १२१२ टेस्ट झाल्या. यात ६५ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अंबाजोगाई शहरात व्यापाऱ्यांच्या अँटिजेन टेस्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस शहरात नागरी रुग्णालय व जिल्हा परिषद शाळा या दोन केंद्रांवर व्यापाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या टेस्ट महत्त्वपूर्ण मानल्या जातात. मात्र, अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांनी अँटिजेन टेस्ट करण्याबाबत मोठ्या प्रमाणात निरुत्साह दाखविला. शासनाने अँटिजेन टेस्ट करण्यापूर्वी व्यापाऱ्यांची वर्गवारी करत ३१९४ व्यापारी टेस्टसाठी ग्राह्य धरले होते. मात्र, केवळ १२१२ व्यापाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेत झालेल्या टेस्टमध्ये ६५ व्यापारी पॉझिटिव्ह निघाले. या व्यापाऱ्यांना अंबाजोगाईच्या लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या कमी मिळालेल्या प्रतिसादामुळे शासनाच्या वतीने पुन्हा ही मोहीम राबविली जाणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.