व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:53+5:302021-03-20T04:32:53+5:30
बीड : सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून ॲन्टिजेन टेस्ट करून प्रशासनास सहकार्यासोबत आपल्या परिवाराची या संसर्गापासून काळजी ...
बीड : सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून ॲन्टिजेन टेस्ट करून प्रशासनास सहकार्यासोबत आपल्या परिवाराची या संसर्गापासून काळजी घ्यावी. ज्या व्यापारी बांधवांनी टेस्ट केली नसेल त्या सर्वांनी टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, गणेश बलदवा, दीपक कर्नावट, हनुमानदास मंत्री यांनी केले आहे.
कोविड - १९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांची ॲन्टिजेन तपासणी मोहीम १० ते १५ मार्चपर्यंत ठेवण्यात आली होती. या टेस्टिंग मोहिमेत जिल्ह्यातील व शहरातील अनेक व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी तपासणी करुन घेतलेली आहे. परंतु काही व्यापाऱ्यांनी अद्याप तपासणी करुन घेतलेली नाही. अशा व्यापाऱ्यांवर प्रशासनामार्फत कडक कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
अॅन्टिजेन तपासणी मोहिमेत निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यापार्यांना प्रशासनाच्यावतीने एक प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. तपासणी मोहिमेत ज्या व्यापार्याकडे अशा प्रकारचे प्रमाणपत्र नसेल तर त्या व्यापार्यांवर कडक कार्यवाहीचे आदेश यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिलेले आहेत.
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात शुक्रवारी व्यापारी प्रतिनिधींची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कोविड - १९चा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्या व्यापाऱ्यांनी ही टेस्ट केलेली नाही, अशा सर्व व्यापाऱ्यांनी व त्यांच्या दुकानात काम करत असलेल्या कामगारांची टेस्ट करणे आवश्यक आहे, परंतु असे निदर्शनास आले आहे की, बऱ्याच व्यापाऱ्यांनी अद्याप तपासणी केलेली नाही.
वेळीच तपासणी केली नाही तर एक ते दोन दिवसात नाईलाजास्तव जिल्ह्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले.