गेवराईत कोरोना चाचणीकडे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:44 AM2021-02-27T04:44:40+5:302021-02-27T04:44:40+5:30
पहिल्या दिवशी १९ जणांची तपासणी : तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली सखाराम शिंदे गेवराई : बीड जिल्ह्यात व राज्यात कमी ...
पहिल्या दिवशी १९ जणांची तपासणी : तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
सखाराम शिंदे
गेवराई : बीड जिल्ह्यात व राज्यात कमी प्रमाणात झालेला कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आता काही दिवसांपासून वाढत चालला असून याला आळा बसावा म्हणून तहसिलदारांनी शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी, दुकानदार,हातगाडे, रिक्षा ,भाजी विक्रेत्या,किराणा सह सर्वांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देत आवाहन केले होते. मात्र या आदेशाला येथील व्यापारी बांधवांनी पहिल्याच दिवशी केराची टोपली दाखवली असून गुरुवारीएकही फळ, भाजी विक्रेता,रिक्षावाले आदी कोणीच कोरोना चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात फिरकले नाहीत.
दोन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण कमी झाले होते.मात्र नागरिक विना मास्क फिरत असल्याने तसेच गर्दी होत असल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या निर्देशाुसार येथील तहसिलदार सचिन खाडे यांनी तीन दिवसांपूर्वी एक बैठक घेवुन एक आदेश काढला होता. शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांची २५ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत वेगवेगळ्या दिवशी कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला येथील व्यापारी बांधवांनी केराची टोपली दाखवली. गुरुवारी पहिल्या दिवशी फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते,रिक्षा चालक यांची चाचणी ठेवली होती. मात्र या पैकी एकही जण येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे कोरोना चाचणीसाठी फिरकला नाही. शुक्रवारी शहरातील कापड व्यापारी,भांडी व्यापारी,एस.टी. विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी होणार आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी येथील व्यापा-यांची कोरोना चाचणी करण्यासाठी गुरुवारपासून सुरूवात केली आहे. यात शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली चाचणी करून घ्यावी. जे कोणी चाचणी करणार नाहीत त्यांची दुकाने १० मार्चपासून उघडता येणार नाहीत, असे तहसिलदार सचिन खाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गुरुवारी शहरातील एकही व्यापारी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी आला नाही. मात्र जातेगांव येथे ४ व चकलांबा येथे १५ व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेतली आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपआपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी केले.