वाढत्या निर्बंधांमुळे व्यवसाय कोलमडण्याची व्यापाऱ्यांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:10+5:302021-07-11T04:23:10+5:30
अंबाजोगाई : शासनाच्या आदेशानुसार दुपारी ४ वाजता दुकाने बंद केली जातात. दिवसेंदिवस कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या ...
अंबाजोगाई : शासनाच्या आदेशानुसार दुपारी ४ वाजता दुकाने बंद केली जातात. दिवसेंदिवस कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयामुळे व्यापार कोलमडतो की काय? अशी चिंता आता व्यापाऱ्यांना भेडसावू लागली आहे.
अंबाजोगाईत व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत विविध संकटांचा सामना केला. आता तिसऱ्या लाटेपूर्वीचे निर्बंध असह्य ठरत आहेत. दुपारी ४ वाजल्यानंतर ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होतात. त्याचवेळी दुकाने बंद करावी लागत आहेत. दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, स्वतःचा घरखर्च, बँकांचे हप्ते, जीएसटी, विविध कर भरायचा कसा? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्धा दिवसच दुकाने सुरू राहतात. सकाळच्यावेळी अनेक व्यापाऱ्यांकडे ग्राहकच नसतात. सायंकाळी थोडाफार व्यवसाय होतो. त्याचवेळी दुकाने बंद करावी लागतात. आणखी काही दिवस ही परिस्थिती राहिली, तर व्यापारी पूर्णपणे कोलमडून जातील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दुसरी लाट ओसरल्यानंतर ७ जूनला निर्बंध उठविण्यात आले. बाजारपेठ हळूहळू पूर्ववत होत होती. मात्र, तीन आठवडेही झाले नाहीत, तोच
पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
डेल्टा प्लसचा रुग्ण अद्यापही बीड जिल्ह्यात सापडला नाही. तरीही डेल्टा प्लसच्या नावाखाली कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
अंबाजोगाईत कोरोनाची रुग्णसंख्याही आटोक्यात आहे. व्यापारी नियमांचे पालन करूनच व्यवसाय करीत आहेत. व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अशा स्थितीत व्यवसाय करायचा तरी कसा? ही समस्या दिवसेंदिवस भेडसावू लागली आहे.
व्यापाराची गती मंदावली
निर्बंधांसह बाजारपेठ उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र, उद्योग, व्यवसायाची गती मंदावली आहे. दिवसभर दुकानात बसूनही ग्राहक फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडल्यास उर्वरित सर्व व्यवसायाला कासवगती असल्याने दुकानदारांत असंतोष आहे. असाच प्रतिसाद राहिल्यास चरितार्थ कसा चालवायचा? अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
पोलिसांचीही होतेय दमछाक
चार वाजले की दुकाने बंद करण्यासाठी पोलीस गस्त सुरू होते. अगोदरच कमी असलेली पोलिसांची संख्या व गावची वाढती व्याप्ती त्या तुलनेत पोलीसबळ कमी आहे. मात्र अशाही स्थितीत गावभर फिरत दुकाने बंद करण्याची मोहीम त्यांना दररोज राबवावी लागते.
तर व्यापाऱ्यांना वाटते शिथिल झालेले नियम पुन्हा लागू करण्यात आले. नवीन नियमानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ व शनिवार व रविवार पूर्णतः व्यापार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने ठराविक वेळेत बंद करावी लागतात. या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था राखत नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात घाम फुटत आहे. पोलिसांची गाडी दिसताच दुकानदारांची होणारी धावपळ, पूर्वी मुकाट्याने बंद करणारा दुकानदार आता हुज्जत घालत असून, दुकान बंद करण्यास मज्जाव करताना दिसत आहेत. जबरदस्तीने दुकाने बंद झाली, तरी रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. दरम्यान, पोलीस व सरकार यांच्याविरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे.. कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेत नागरिकांचा संयम हळूहळू डगमगताना दिसत आहे.