परळीच्या मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:30 AM2021-02-07T04:30:47+5:302021-02-07T04:30:47+5:30
परळी : शहरातील मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा ...
परळी : शहरातील मोंढा मार्केट परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यास प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे, असा आरोप मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी केला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविणे तारेवरची कसरत झाली आहे. जड वाहने ही या ठिकाणाहून जात असल्याने व रस्त्यातच विविध गाडे लागत असल्याने व दुकानांचे सामान रस्त्यावर मांडण्यात येत असल्याने शहरात वाहतुकीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. याकडे ना नगरपरिषद लक्ष देते, ना पोलीस प्रशासन लक्ष देते. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे परळीकरांची डोकेदुखी वाढली आहेे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असायला हवी. परंतु,गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीत वाहतूक नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, असा आरोप पाथरकर यांनी शुक्रवारी केला आहे. आपण या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल बनत चालली आहे. मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोविंदराव फड यांनी बाजार समिती परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु पुन्हा पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे पुन्हा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुख्य रस्त्यावरच फळांची गाडी लागत आहे. तसेच काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही दुकानदार आपले सामान रस्त्यावर लावत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना ही रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे.
काही व्यापाऱ्यानी पादचारी मार्गावर अतिक्रमण केलेले आहे. ५ फुटांची जागा ही लाखो रुपयांची आहे. तसेच काही गाड्यावाले कुठेही गाडा लावतात. याकडे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
‘शहरात फूटपाथ आणि नाल्यावर नगरपरिषदेच्या संगनमताने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असून त्याचा परळीकरांना त्रास होत आहे’ - बालाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते परळी
शहरातील काही दुकानदार दुकानातील अर्धा माल दुकानासमोर रस्त्यावर लावतात. मग दुचाकी लावायच्या कुठे? त्याला पोलीस यंत्रणा काय करणार? बातमी आली की ते दुचाकी गाडीवाल्यांना दंड ठोठावतात. ज्यांच्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे ते दुकानदार बाजूलाच राहतात.
- नवीन मराठे, परळी