१२५ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांना प्रशिक्षण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:33 AM2021-02-16T04:33:52+5:302021-02-16T04:33:52+5:30
आष्टी।: अविनाश कदम ‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवकांना दिनांक ११ व १२ फेब्रुवारी ...
आष्टी।: अविनाश कदम
‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवकांना दिनांक ११ व १२ फेब्रुवारी रोजी सन २०२१ व २०२२मधील कृती आराखडा तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण दोनदिवसीय कार्यशाळेमधून देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन सभापती बद्रिनाथ जगताप यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, विस्तार अधिकारी गोकुळ बागलाने, एन. डी. शिंदे, आबासाहेब खिलारे, त्रिंबक मुळीक, नवनाथ लोंढे, काकासाहेब आगासे, दत्ता घोडके, सतीश बोडखे, बाळासाहेब थोरवे, दीपाली गायकवाड, आनंद शिंदे, हनुमंत भिसे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून कोणती कामे कशी करावी, याविषयी प्रशिक्षक गौतम वाघमारे व पिंप्रीकर यांनी मार्गदर्शन केले.
विविध योजनांची दिली माहिती
या दोनदिवसीय कार्यशाळेत अंगणवाडीसाठी-बालकांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक खेळणी पुरविणे, गणवेश पुरविणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालय बांधकाम, कुपोषित बालकांना आहार पुरविणे, अंगणवाडी डिजिटल करणे, ई-लर्निंग उपक्रम अभ्यासक्रमानुसार खेळाचे साहित्य पुरविणे, वाचनालयासाठी प्रत्येक शाळेला दोनशे पुस्तके देणे, युवकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण घेणे, सामूहिक शेती, करार शेती, कृषी अवजारे स्थापन करणे, शेतकरी प्रशिक्षण, विपणन, उत्पादन वृद्धी, शेतीविषयक सल्ला केंद्राची स्थापना करणे, दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन देणे, कुक्कुटपालन, शेळीपालनसाठी अर्थसहाय्य करणे, सामूहिक शेततळे, बंधारा बांधणे, महिलांसाठी व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे, स्मशानभूमी बांधणे या व्यतिरिक्त अशा विविध प्रकारच्या योजनांचे प्रशिक्षण व माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.