सरकारी डॉक्टरांच्या बदल्या वादात; १२ तास अगोदरच १२६२ जणांची यादी व्हायरल
By सोमनाथ खताळ | Published: June 11, 2023 12:42 PM2023-06-11T12:42:07+5:302023-06-11T12:42:20+5:30
‘बेईमानी’ केल्याचा आरोग्य विभागाचा दावा, रात्री अधिकृत आदेशातही तीच पदस्थापना
बीड : वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच आता ही प्रक्रिया वादात सापडली आहे. कारण १२ तास आगोदरच १२६२ डॉक्टरांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आरोग्य विभागाने जरी ‘काही बेईमान घटकांचे हे अवैध कृत्य आहे’ असा दावा केला असला तरी त्याच व्हायरल यादीप्रमाणे डॉक्टरांना पदस्थापना देण्यात आली आहे. रात्री ८ वाजेनंतर याबाबत प्रत्येकाचे वैयक्तिक आदेश साइटवर अपलोड करण्यात आले.
राज्यातील शासकीय डॉक्टरांच्या ऑनलाइन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. मे महिन्यापासूनच याची प्रक्रिया सुरू झाली होती. अगोदर ज्येष्ठतेनुसार यादी प्रकाशित करून त्यांच्याकडून आवडीची ठिकाणे मागविण्यात आली. उपसंचालक कार्यालयांकडून याची छाननी करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. परंतु सुरुवातीपासूनच यात गोंधळ उडाला आहे. वेळेनुसार याद्या प्रकाशित न करणे, चुकीची पदस्थापना दाखविणे आदींचा यात समावेश आहे.
बदल्यांची ही प्रक्रिया दि. ३१ मेपर्यंत पूर्ण होणार होती, परंतू याला दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली. असे असतानाच शनिवारी पहाटे २०५ पानांची यादी पडली. यात १२६२ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु यातील त्रुटी पाहून काही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आयुक्तांनी ‘काही बेईमान घटकांचे हे अवैध कृत्य आहे’ असे म्हणत ही यादी खोटी असल्याचा खुलासा केला होता. परंतु रात्री ८ वाजता त्याच व्हायरल यादीप्रमाणे डॉक्टरांना पदस्थापना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कही खुशी, कही गम...
या बदल्यांच्या यादीत काही डॉक्टरांना मनासारखे ठिकाण मिळाले आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी झोपेतून उठण्याआधीच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, तर ज्यांची नावे नव्हती, अशांचा मात्र 'बीपी' वाढला होता. त्यांनी लगेच संचालक, आयुक्त कार्यालयात फोनोफोनी करून माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंतही त्यांची नावे पडली नव्हती.
वेबसाइट हॅक झाल्याच संशय
आरोग्य विभागाकडून हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला जात असला तरी ही २०५ पानांची यादी ‘ऑफिसरट्रान्सफर महा-आरोग्य.कॉम’ या साइटवरूनच डाऊनलोड केल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे एक तर कंत्राटदाराची चूक आहे किंवा ही साइट कोणी तरी हॅक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
ओटीपी नावालाच, कोणाचीही माहिती पाहता येते...
वेबसाइटवर आदेश पाहायचा असल्यास संबंधित डॉक्टरने मोबाइल क्रमांक टाकताच त्यावर ओटीपी येतो. तो टाकल्यानंतर त्यांची ऑर्डर व अर्ज दिसतो; परंतु हे केवळ नावालाच आहे. वास्तविक पाहता केवळ मोबाइल नंबर टाकल्यावर कोणाचीही माहिती पाहता येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ओटीपी दिलाच कशाला? हा सवाल आहे.
काय म्हणाले आरोग्य संचालक...
व्हायरल झालेली २०५ पानांची यादी खोटी आहे. कोणी तरी खोडसाळपणा केला आहे. याबाबत आम्ही एफआयआर करणार आहोत. बदल्या होणार आहेत, परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत ऑर्डर पडू शकतात, अशी प्रतिक्रिया संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दुपारी ‘लोकमत’ला दिली होती. रात्री ९ वाजता त्यांना पुन्हा या गोंधळाबाबत विचारण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट-रिचेबल होता. तसेच आयुक्त धिरजकुमार यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
माझी सेवा जवळपास चौदा वर्षे झालेली असताना केवळ सहा वर्षे दाखविली. मी त्रुटीही नोंदविली होती, परंतु दखल घेतली नाही. शिवाय मी दिलेल्या पसंतीच्या १० ठिकाणांपैकी एकाही ठिकाणी नियुक्ती न देता धाराशिव जिल्हा रुग्णालयात दिली आहे. आता यावर आक्षेप नोंदविणार आहे. जर न्याय मिळाला तर ठीक नाहीतर मॅटमध्ये जाणार आहे.
-डॉ. बाबासाहेब ढाकणे,
वैद्यकीय अधिकारी, बीड