आठ महिन्यांत माजलगाव नगरपालिकेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:16+5:302021-09-21T04:37:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : गेल्या चार वर्षांपासून माजलगाव शहराच्या विकासाला खीळ बसली होती; परंतु आठ महिन्यांपूर्वी पदभार घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : गेल्या चार वर्षांपासून माजलगाव शहराच्या विकासाला खीळ बसली होती; परंतु आठ महिन्यांपूर्वी पदभार घेऊन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी शहराचा कायापालट केला आहे. त्यांनी रस्ते, घरकुल योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल पालिकेच्या कामाचे कौतुक केले.
माजलगाव पंचायत समितीच्या नवीन वास्तूचा रविवारी लोकार्पण सोहळा पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी येथील नगर परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या नवीन वास्तूची पाहणी करून समाधान व्यक्त केले. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी आठ महिन्यांपूर्वी पदभार घेऊन दिवस-रात्र एक करून ‘न भूतो न भविष्यती..’ असे दर्जेदार रस्ते शहरात करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे रमाई, पंतप्रधान आवास योजनेतून ४५० लाभार्थ्यांना ५ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश देऊन अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. शहरातील अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना म्हणून वॉल दुरुस्ती करून लोकांची तहान भागविली. नगर परिषदेच्या नवीन वास्तूचा चौदा वर्षांचा वनवास त्यांनी तीन महिन्यांतच संपवून जनतेसाठी सुसज्ज नगरपालिका कार्यान्वित केली आहे. उरलेल्या काळात शहरातील शिल्लक समस्यांचा निपटारा करण्याची त्यांची धडपड लपून राहत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढून नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या कामाची प्रशंसा केली. अशा दर्जेदार कामांमुळे भविष्यात माजलगाव नगर परिषदेला मीही माझ्या परीने मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुंडे म्हणाले.
याप्रसंगी पालकमंत्री मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, जि.प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, सभापती जयसिंग सोळंके यांचाही सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी विशाल भोसले, सर्व न.प. सदस्य, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.