ट्रान्स्फार्मर जळाल्याने 15 दिवसांपासून 5 गावांना होतो केवळ 3 तास वीज पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 03:24 PM2017-09-25T15:24:34+5:302017-09-25T15:25:40+5:30
तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परळी ( बीड ) दि. 25 : तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या गावामध्ये दिवसातून केवळ 3 तासच विज पुरवठा चालू असतो व 21 तास विज गुल असते.
१० सप्टेबरला दाऊतपुर येथील 33 के.व्ही. सबस्टेशन ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड झाला आहे. याचा मोठा फटका दाऊतपुर, दादाहरी वडगाव, दगडवडी, सेलू, धारावती तांडा या गावानां बसला आहे. ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, शेतीला पाणी देणे तसेच जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करणे सुद्धा कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या विहीरीवरील विद्युत मोटारी विजे अभावी चालू नसल्याने गावात पाणी पुरवठा होत नाही. तसेच धान्याचे दळण करण्यासाठी ग्रामस्थांना परळीत यावे लागत आहे.
वीज मंडळाचे दुर्लक्ष
ग्रामस्थ त्रस्त असताना वीज मंडळ या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दाऊतपुरचे सरपंच प्रविण दिलीपराव बिडगर यांनी केला आहे. शेती पंपाचाही विज पुरवठा बंद असल्याने गेल्या 15 दिवसांपासून पाणी असूनही पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे कापूस, ऊसाचे नुकसान होत आहे. यासोबतच ग्रामस्थांचे हाल होत असल्याची प्रतिक्रिया रमेश बिडगर व प्रभाकर सुरवसे यांनी दिली.
मागील ४ दिवसांपासून वीज पुरवठा बंद
दाऊतपुर सह कांही गावांत 8 तास विज पुरवठा चालू आहे. 2 तास शेती पंपासाठी विजपुरवठा चालू आहे. यासोबतच दाऊपुरातील 33 के.व्ही. चा ट्रान्सफार्मर हा 21 सप्टेंबर रोजी बिघडला असून तो दुरूस्तीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच ट्रान्सफार्मर दुरूस्त होऊन विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती वीज मंडळातील अधिका-यांनी दिली.