१०२ जनावरे एका टेम्पोत निर्दयीपणे कोंबून तस्करी; २५ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 10:27 AM2023-04-19T10:27:42+5:302023-04-19T10:28:03+5:30
याप्रकरणी दोघा तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- नितीन कांबळे
कडा - रात्रीची गस्त सुरू असताना एका टेम्पोत गोवंशीय जनावरं असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळताच पोलिसांनी सापळा रचून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १८) पहाटे करण्यात आली. टेम्पोत निर्दयीपणे १०२ जनावरे कोंबली होती. पोलिसांनी टेम्पोसह जनावरं असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हदगाव येथुन उस्मानाबादकडे एका टेम्पोत कत्तलीलासाठी १०२ जनावरं जात असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. यावरू किनारा चौकात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. संशयित टेम्पो पोलिसांनी थांबवत तपासणी केली. यावेळी त्यामध्ये ९६ लहान वासरे , ६ विदेशी गाई अत्यंत निर्दयीपणे क्रुरपणे डांबुन ठेवल्या होत्या. यातील २५ जनावरे मृत स्थितीत आढळून आले. कत्तल करण्याचे हेतूने जनावरांची तस्करी उघडकीस आली. पोलिसांनी टॅम्पो (क्रमांक एम.एच १२,बी.वाय. ९९९१) सह जनावरे असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक जाकेर जलाल शेख, वय 23 वर्ष, रा. हदगाव, ता. शेवगांव, जि.अहमदनगर व मालक फिरोज रशीद शेख रा.उस्मानाबाद याच्यावर पोलीस हवालदार विकास राठोड याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर,पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास राठोड, दत्तात्रय टकले, पोलीस नाईक प्रविण क्षीरसागर, नितीन बहीरवाळ यांनी केली.