सोशल मीडियाचा फास ! महिलेकडून जाच होत असल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 07:35 PM2020-12-08T19:35:45+5:302020-12-08T19:39:03+5:30
दीपक याच्या बहिणीने त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो दिसून आले.
बीड : धारूर तालुक्यातील कासारी फाटा येथील शेतवस्तीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आस्कमिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तरुणाचा मोबाइल त्याच्या बहिणीने तपासला असता, पुणे येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सुभाष सांगळे (वय २५, रा. कासारी पाटी, धारूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने ४ डिसेंबर रोजी गावाजवळील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याची आणि पुणे येथील रहिवासी आरती हिच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान तो तिला भेटण्यासाठी पुणे येथे गेला होता. मात्र, त्यानंतर दीपक याच्याकडे असलेला ट्रक नावावर कर, शेती नावावर कर, तसेच लग्न करण्यासाठी आरतीकडून मानसिक छळ सुरू झाला होता.
संबंध तोडण्यासाठी त्याने त्याचा मोबाइल नंबरदेखील बदलला होता. मात्र, दीपक याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर याने त्या महिलेला नंबर दिला. त्यानंतर पुन्हा त्या महिलेकडून त्रास देणे सुरू झाले. याला कंटाळून दीपक याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचा सुगावा घरच्यांना लागत नव्हता. मात्र, दीपक याच्या बहिणीने त्याचा मोबाइल तपासला असता त्यामध्ये संबंधित महिलेचे फोटो दिसून आले. त्यावरून सर्व घटना उघड झाली. त्यानंतर ६ रोजी रात्री उशिरा धारूर पोलीस ठाण्यात शीतल घुगे यांच्या फिर्यादीवरून आरती (रा. पुणे) व ज्ञानेश्वर मुर्गीकर (रा. धारूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रदीप डोलारे करीत आहेत.