दिवसाढवळ्या चारचाकीत घुसून व्यापाऱ्याला लुटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 04:30 PM2020-10-27T16:30:11+5:302020-10-27T16:31:45+5:30
या रॉबरीमुळे व्यापाऱ्यांसह शहरवासियात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजलगाव : शहरातील मोंढा भागात दिवसा ढवळ्या बीड येथील व्यापारी वसुलीसाठी माजलगावात आले असता, चारचाकीत घुसून चालकाला मारहाण केली. नगदी १ लाख ७२ हजार व मोबाईल असा १ लाख ८० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी दुपारी १ वा. घडली. या रॉबरीमुळे व्यापाऱ्यांसह शहरवासियात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड येथील राजेश हार्डवेअरचे मालक सुशिल शिवाजी काटकर हे व्यापारी माजलगाव येथे दैनंदिन कामासाठी व वसुलीसाठी आले होते. याच निमित्ताने गेवराई येथील वसुली करून २६ रोजी दुपारी १ वाजता सुशिल काटकर व चालक मंकेश मोहन खांडे हे चारचाकी (एम.एच.२३, ए.डी.३१३३) घेवून माजलगाव येथील जुना मोंढा भागात वसुलीसाठी आले होते. यावेळी नाईक यांचे हार्डवेअर दुकानात वसुलीसाठी सुशिल काटकर हे गेले. त्यांनी जाताना त्यांच्या जवळील पैशाची बॅग चारचाकीत ठेवली होती. चालक मंकेश खांडे हा संजय किराणा दुकानासमोर गाडीतच बसला होता.
यावेळी २५ ते ३० वयोगटातील काळ्या रंगाचा टि-शर्ट घातलेला मुलगा गाडी जवळ आला व गाडी पुढे घ्या असे चालक खांडे यांना सांगु लागला. यावेळी खांडे यांनी गाडी पुढे घेतली, यावर आणखी पिवळ्या रंगाचा टि-शर्ट घातलेला आणखी एक मुलगा गाडी जवळ येत दरवाजा उघडून अचानक चालकांच्या छातीत बुक्या मारू लागला. यावर चालक खांडे यांनी गाडीचा दरवाजा लावून घेतला. त्यावर तो मुलगा पाठीमागचा दरवाजा उघडून गाडीमध्ये येवून कॉलरला धरून गाडी पुढे घे, नाही तर खुपसीन असे धमकावू लागला.
यावर मी गाडी पुढे घेत असतांनाच दुसरा एक मुलगा तिथे आला व गाडीत ठेवलेली पैशाची बॅग (ज्यात दीड लाख रूपये होते) घेवून पळुन गेला. गाडीत बसलेला मुलगा मला गाडी पुढे घेण्यास लावून बायपास रोडवर थांबवली. यावेळी आणखी एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा जवळ आला व तुझ्या जवळचे आणखी आहे ते दे, असे धमकावले. बळजबरीने खिशातील २२ हजार रूपये, ए.टी.एम. व मोबाईल हे घेवून पसार झाले. माजलगाव शहर ठाण्यात चालक मंकेश मोहन खांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि अविनाश राठोड हे करत आहेत.