प्रवासी महिलेचे १५ तोळे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:26 AM2018-12-16T00:26:25+5:302018-12-16T00:27:20+5:30
भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना कळवला. त्यानंतर बस तात्काळ शिवाजीनगर ठाण्यासमोर उभी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भूसावळ येथून परळीकडे निघालेल्या वृध्द प्रवासी महिलेच्या बॅगमधील १५ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता बीड बसस्थानकात घडली. दरम्यान दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने हा प्रकार चालक-वाहकांना कळवला. त्यानंतर बस तात्काळ शिवाजीनगर ठाण्यासमोर उभी केली.
लता देविदास महाजन (वय ६२, रा. टीपीएस कॉलनी, परळी) असे प्रवासी महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्या भुसावळ येथील भावाला भेटून मुलाच्या गावी परळीकडे एकट्याच येत होत्या. दुपारी ३ वा. सुमारास त्या भुसावळ-परळी या बसमधून (एमएच १४ बीटी २५२१) बीड स्थानकात पोहचल्या. त्यावेळी दागिने ठेवलेल्या बॅगची त्यांनी पाहणी केली होती. दरम्यान, दहा मिनिटांसासाठी बस येथे थांबली होती. प्रवासी महाजन यांनी बसमध्येच जेवण केले. याचवेळी केव्हातरी अज्ञात चोरट्यांनी बॅगमधील सोन्याचे दागिने चोरुन नेले. थोडा वेळानंतर स्थानकातून बस बाहेर पडत असताना त्यांना दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाहकास हा प्रकार सांगितला. गांभीर्य ओळखून चालकाने बस थेट शिवाजीनगर ठाण्यासमोर आणून उभी केली. इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, महिलेने घडलेला प्रकार कथन करताच शिवाजीनगर पोलीस कर्मचाºयांनी बसस्थानक परिसरात जाऊन पाहणी केली. सीसीटिव्ही फुटेजही तपासले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.