‘स्टाफ’ असल्याचे सांगून फुकटात प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:02 AM2019-09-27T01:02:38+5:302019-09-27T01:02:55+5:30
मी राज्य परिवहन महामंडळाचाच कर्मचारी आहे, असे सांगत फुकटात प्रवास करणाऱ्या एकाला चांगलेच अंगलट आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मी राज्य परिवहन महामंडळाचाच कर्मचारी आहे, असे सांगत फुकटात प्रवास करणाऱ्या एकाला चांगलेच अंगलट आले आहे. पथकाच्या तपासणीत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्याला पकडून पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. गुरूवारी दुपारी हा प्रकार बीड शहरातील बार्शी नाका परिसरात घडला. अब्दुल फहिम अब्दुल जलील मोमीन (वय ४०, रा. मोमीनपूरा, बीड) असे या प्रवाशाचे नाव आहे.
कळमनूरी - बीड ही बस (क्र. एम एच २०, बीएल १७९३) बीडकडे येत होती. बसमध्ये सुमारे ८० च्या जवळपास प्रवासी होते. अब्दुल हा तेलगाव येथून बसमध्ये बसला. त्याने वाहकाला आपण रामपचा ‘स्टाफ’ असल्याचे सांगितले. वाहकाने ओळखपत्र मागितल्यावर त्याने नंतर दाखवितो असे सांगितले. जास्त प्रवासी असल्याने वाहक विसरले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाने (क्र.पाच) बार्शी नाका परिसरात अचाकन बसची तपासणी केली.
यावेळी अब्दुलकडे तिकिट नसल्याचे दिसले. वाहतूक निरीक्षक टी. डी. कलीके, वाहतूक नियंत्रक बी. टी. सेलूकर यांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याने आपण बीडच्या वर्कशॉपमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. उलटतपासणी करून माहिती घेतली असता हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समजले. त्यानंतर बस स्थानकात नेली. तेथे प्रवासी सोडल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात बस आणली. परंतु हद्द पेठबीड ठाण्याची असल्याने ती पुन्हा तिकडे नेण्यात आली. येथे वाहक लक्ष्मण शंकर हनवते यांच्या तक्रारीवरुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
एईओ पन्हाळकर, नाव सांगितले तिसरेच..
अब्दुलने कार्यशाळेत कार्यरत असल्याचे सांगताच निरीक्षक सेलूकर यांनी तुमचे यंत्र अभियंता (एमईओ) कोण आहेत? अशी विचारणा केली. तीन मिनिटात त्यांनी सहा नावे सांगितले. प्रत्यक्षात मात्र, अशोक पन्हाळकर यांचे नावच घेतले नाही. त्यावरून अब्दुल हा खोटे बोलत असल्याचे उघड झाले. त्याचा फोटोही कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना पाठविला होता. यामध्ये एकानेही त्यांना ओळखले नाही.