बीडमध्ये मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार; वीज गेल्यावर पर्यायी व्यवस्थाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:30 AM2018-03-27T00:30:20+5:302018-03-27T00:30:20+5:30

बीड जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक वीज गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात विभागातील रुग्णांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्याची वेळ आली. ही गंभीर परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर येतो.

Treatment of patients in the light of mobile phones in Beed; There is no alternative arrangement after the electricity is gone | बीडमध्ये मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार; वीज गेल्यावर पर्यायी व्यवस्थाच नाही

बीडमध्ये मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार; वीज गेल्यावर पर्यायी व्यवस्थाच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक वीज गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात विभागातील रुग्णांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्याची वेळ आली. ही गंभीर परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर येतो.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील वीजपुरवठा करणाऱ्या खांबावरील विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे या भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला होता. याचवेळी जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती पाहिली असता सर्वत्र अंधार होता. गेवराईहून १०८ रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याचवेळी वीज नसल्याने या रुग्णावर मोबाईल टॉर्चचा आधार घेत उपचार करावे लागले. यावेळी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले.

दरम्यान, याचवेळी अपघात विभागाच्या दारासमोरच वेळेवर उपचार न झाल्याने एका रुग्णाने उलटी केली. त्याला वार्डमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आले. परंतु अंधार असल्याने कोणता वार्ड कोठे आहे, हेच त्याला समजत नव्हते. एवढ्यात दोन ते तीन मद्यपी तेथे आले. मात्र, ते मध्ये न जाता सुदैवाने परतले. या मद्यपींनी जर जिल्हा रुग्णालयात अंधाराचा फायदा घेत गोंधळ घातला असता यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या अपघात विभागात अनेक महिला कर्मचारी, डॉक्टरही असतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नव्हता हे विशेष. या निमित्ताने सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.

पर्यायी व्यवस्था कुचकामी
जिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र रोहित्र आहे. तसेच जनरेटरही आहे. परंतु येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे वीज गेल्यानंतर तात्काळ याची सुविधा मिळत नाही. याचा फटका रुग्णांना सहन करावा लागतो. तसेच डॉक्टरांनाही तपासणी व उपचार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येते.

डॉक्टरची अरेरावी
गेवराईहून १०८ रुग्णवाहिकेतून रुग्ण घेऊन आलेल्या एका डॉक्टरला विजेसंदर्भात विचारले. याच वेळी त्याने अरेरावी करीत उद्धट वर्तणुकीचे दर्शन घडविले. एका रुग्णालाही त्याने व्यवस्थित माहिती न दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. माहिती नसली तरी रुग्णांना प्रेमाने सांगण्याची तसदी या डॉक्टरने घेतली नाही. या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गैरप्रकारांना निमंत्रण
जिल्हा रुग्णालयात चोरीचे प्रकार घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मद्यपी, आरोपींचा येथे सर्रास वावर असतो. याच अंधाराचा फायदा घेऊन अशा लोकांपासून गैरप्रकार घडण्याचे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी २४ तास विजेची व्यवस्था असणे गरजेचे आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल.

सीएसनी घेतली दखल
जिल्हा रुग्णालयातील अंधाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी यंत्रणेस कामाला लावले. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात जिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा सुरळीत झाला. डॉ. थोरात यांना या प्रकाराची माहिती नसती तर किती वेळाने वीज आली असती, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यानंतर असा प्रकार होणार नाही अशी ग्वाही डॉ. थोरात यांनी दिली.

Web Title: Treatment of patients in the light of mobile phones in Beed; There is no alternative arrangement after the electricity is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.