वृक्षतोडीने आंदोलकांचा निवारा हिरावला, कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले ग्रीन शेडनेट भेट
By शिरीष शिंदे | Published: January 16, 2024 06:15 PM2024-01-16T18:15:57+5:302024-01-16T18:19:51+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गांधीगिरी आंदोलन
बीड : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेले वृक्ष तोडण्यात आली आहेत. परिणामी, या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा वृक्ष निवारा हिरावला गेला आहे, याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनास ग्रीन शेडनेट भेट देत मंगळवारी गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी विविध मागण्या मांडण्यात आल्या.
बीड जिल्ह्यात केवळ २.४ टक्के वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे. वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे. मात्र, वनक्षेत्र आणि हरितक्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेत नाही. उलट वृक्षतोडीवर भर देत आहे. नगर रोडवरील शासकीय कार्यालयासमोरील संरक्षण भिंतींच्या आतील रस्ता कामास अडथळा नसणारी अनावश्यक वृक्षतोड थांबवावी, वन विभागातील १० कोटी ८४ लाख गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करावी, अवैध बेसुमार वृक्षतोडप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावा.
या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी ग्रीन शेडनेट तयार केले. त्यास फुलांचे तोरण बांधून श्रीफळ फोडून जिल्हा प्रशासनाला भेट देऊन गांधीगिरी आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, सुदाम तांदळे, मुबीन शेख, मुस्ताक शेख, शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते.
अनावश्यक वृक्षतोड थांबवावी
बीड शहरातील नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, तहसील, न्यायालय कार्यालयासमोर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी असलेले हिरवेगार महाकाय वृक्ष रस्ता कामास अडथळा येत नाहीत. संरक्षण भिंतींच्या आतील झाडांची वृक्षतोड होत असून तातडीने थांबविण्यात यावी, तसेच रस्ते कामासाठी झाडे तोडल्यानंतर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणती योजना आखण्यात आली, याची माहिती वृक्षप्रेमींना द्यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.