दुभाजकातील झाडे बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:38 AM2021-02-20T05:38:02+5:302021-02-20T05:38:02+5:30
अपघातास निमंत्रण बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच ...
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थिंना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. तक्रारीनंतरही लक्ष दिले जात नाही. पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
बोंडअळीमुळे शेतकरी संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
तारांमुळे धोका वाढला
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून, महावितरणने या तारा बदलण्याची मागणी केली जात आहे.
बीडमध्ये मोफत आरोग्य तपासणी
बीड : शहरात भगीरथ बियाणी यांच्या वतीने खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात सामान्य नागरिकांची मोफत बॉडी चेकअर आणि इतर आजारांवर तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी बियाणी यांच्यासह शांतीनाथ डोरले, विजय नागरगोजे, मनीषा जायभाये, वायबसे, राम आदींची उपस्थिती होती.