परळीपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:12 AM2020-01-02T08:12:55+5:302020-01-02T08:14:40+5:30
परळी तालुक्यातील लाडझरी गावचे सुपुत्र महेश यशवंत तिडके
बीड - नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील नौशेरा विभागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक संदीप सावंत यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहेत. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी होते. तर, दुसरीकडे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावताना पंजाबमधील भटिंडा येथे परळीतील सुपुत्राला वीरमरण आले. मंत्री धनंजय मुंडेंनी जवान महेश यांना आदरांजली वाहिली आहे.
परळी तालुक्यातील लाडझरी गावचे सुपुत्र महेश यशवंत तिडके हे भारतीय सैन्यदलात असून पंजाबमधील भटिंडा येथे कार्यरत होते. बुधवारी कर्तव्यावर असताना महेश यांना वीरमरण प्राप्त झाले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाची बातमी समजताच लाडझरी गावासह परळीत शोककळा पसरली. परळीचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शहीद महेश तिडके यांना श्रद्धांजली वाहत आपले बलिदान सदैव स्मरणात राहिल, असे म्हटले आहे.
दुसरीकडे नौशेरा सेक्टरमध्ये बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोघमोहीम सुरू केली. त्याचदरम्यान, लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. यामध्ये नाईक संदीप रघुनाथ सावंत यांचा समावेश आहे. संदीप सावंत यांच्यापश्चात त्यांची पत्नी सविता आहेत. सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मुंडे गावातील रहिवासी होते. सावंत यांच्यासोबत रायफलमॅन अर्जुन थापा मगर यांनाही वीरमरण आले. ते नेपाळमधील रहिवासी होते.
पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना परळी तालुक्यातील लाडझरीचे जवान महेश यशवंत तिडके यांना वीरमरण आले. शहीद महेश तिडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशासाठीचे तुमचे बलिदान आम्ही नेहमी स्मरणात ठेवू. #अमर_जवानpic.twitter.com/ybqFyqPb10
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 1, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिल्याने पाकचे सहा जवानांना ठार झाले होते. काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या हद्दीतील गावांमध्ये पाकिस्तानी लष्करातर्फे वारंवार गोळीबार व तोफांचा मारा सुरू असल्याने भारतीय जवानांनीही त्यांना तसेच उत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी पूंछ जिल्ह्यातील राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार केला आीणि तोफांचाही मारा केला होता.