तिहेरी खून प्रकरण; कर्तव्यात कसूर करणाऱ्या महिला उपनिरीक्षकासह जमादार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 02:54 PM2019-07-28T14:54:48+5:302019-07-28T14:55:08+5:30
शेतीच्या वादातून पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर तिहेरी हत्याकांड घडले.
बीड : शेतीच्या वादातून पिंपरगव्हाण (ता. बीड) रोडवर तिहेरी हत्याकांड घडले. या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे समोर आले असून पोलीस अधीक्षकांनी महिला पोलीस उपनिरीक्षकासह जमादारास शनिवारी (२८) निलंबित केले. मपोउपनि मनीषा जोगदंड, पोहेकॉ.राजेभाऊ वंजारे असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे. तिहेरी खून प्रकरणातील आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे याने शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिसात दिला होता. त्यावरून ठाणे अंमलदार असलेल्या वंजारे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. परंतु कर्तव्यावर असलेल्या मपोउपनि जोगदंड यांनी गैरअर्जदाराविरोधात तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी तात्काळ कारवाई न करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोघांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात खुद्द पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे.