बीडमध्ये ‘समविचारी’साठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:50 AM2019-01-05T00:50:36+5:302019-01-05T00:51:18+5:30
समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी खा. दानवे हे बीड येथे आले होते. यानिमित्ताने त्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ.सुरेश धस, आ.संगिता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, गोविंद केंद्रे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बूथ कमिट्या गठित करण्याचा पक्षीय कार्यक्रम होता. यासाठी संपूर्ण महाराष्टÑात फिरून आढावा घेत आहे. पक्षाचे संघटन जोमाने कामाला लागले असून भाजपासाठी वातावरणही पोषक आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पाळताना शेतकरी, जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत आणि उर्वरित काळात प्रलंबित कामे, योजनाही पूर्ण होतील, असे ते म्हणाले.
आमच्या काही मित्रपक्षाची नाराजी उघड दिसत असली तरी तीही दूर होईल आणि समविचारी पक्ष आणि आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र येऊन निवडणूक लढवू. एनडीएतून नितीशकुमार बाहेर पडले होते, परंतु, नंतर ते आमच्यासोबत आले, युतीसाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समविचारी मतांचे विभाजन कसे टाळता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार शक्य आहे. बीड जिल्ह्याला संधी मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंंडे यांना निमंत्रित केले नव्हते, असे विचारले असता ते म्हणाले की, हा पालिकेच्या विकास कामांच्या संदर्भातील कार्यक्रम होता. पंकजा मुंडे ह्या एवढ्या पक्षीय कार्यक्रमात व्यस्त आहेत की, माझ्या मतदारसंघात मी त्यांना तीन महिन्यापासून बोलावतो, आहे परंतु त्यांना वेळ मिळत नाही, असे सांगून निर्माण होऊ घातलेल्या वादावर दानवे यांनी पडदा टाकला.
प्रीतम मुंडे उमेदवार : निवडूणही येणार..
संघटनात्मक बैठकींचा आढावा घेत जवळपास संपूर्ण महाराष्टÑ फिरलो आहे. भाजपाची स्थिती अतिशय मजबूत आहे. बीड लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार डॉ.प्रीतम मुंडे ह्याच उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले आहे. प्रीतम मुंडे ह्या आमच्या विजयी उमेदवार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.