आरोपीचा लॉकअपमध्ये ‘फिनेल’ पिण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:58 AM2018-08-21T00:58:07+5:302018-08-21T00:58:28+5:30
माजलगाव : महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला मनोज फुलवरे या आरोपीने सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील लॉकअपमध्येच फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर पुन्हा त्याची लॉकअपमध्ये रवानगी केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
शहरातील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पाच जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी आशिष बोरासह मनोज फुलवरे, प्रमोद कदम यांच्यासह एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेतले होते. सोमवारी आशिष व मनोज यांना न्यायालयात हजर केले जाणार होते.
तत्पूर्वीच मनोजने शौचालयातील फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. प्रकृती ठणठणीत झाल्यावर त्याला पुन्हा लॉकअपमध्ये नेले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी रेफर लेटर दिल्यावरही पोलिसांनी आरोपीला रेफर न करता न्यायालयात हजर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेफर लेटर दिल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद कुलकर्णी यांनी दिली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन म्हणाले, तसा प्रयत्न केला होता परंतु हा प्रकार एवढा काही गंभीर नाही. आम्ही त्याला न्यायालयात हजर केले होते.
पळवाटा काढण्याचा प्रयत्न
अत्याचार प्रकरणात अनेक राजकीय लोकांचा संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताब्यातील आरोपीने पोलिसांच्या चौकशीपासून बचावासाठी हा प्रयत्न केल्याची चर्चा माजलगावात होती. याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असा विश्वास माजलगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गंभीर प्रकरणात हस्तक्षेप ?
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. परंतु काही राजकीय व इतर क्षेत्रातील लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पोलीस तपासाला अडचणी ठरत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके म्हणाल्या, हस्तक्षेपाबद्दल मी काहीच बोलणार नाही. लवकरच प्रकरणाचा रिझल्ट पहायला मिळेल. कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही नवटके यांनी केले.