जावयाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबाची फिर्याद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 07:55 PM2018-01-28T19:55:29+5:302018-01-28T19:55:38+5:30
नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे.
बीड : नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे. गेवराई तालुक्यातील खामगाव येथे ही घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अत्याचाराच्या प्रयत्नात असणा-या जावयाला गेवराई पोलिसांनी रात्री खामगाव परिसरातीलच उभ्या उसातून बेड्या ठोकल्या. चिमुकली सुरक्षित घरी परतल्याने कुटुंबीयांच्या चेह-यावर हास्य फुलले होते. असे असले तरी नात्याला काळिमा फासणा-या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
वर्षा (नाव बदललेले) ही आई-वडील उसतोडणीसाठी गेल्याने आपल्या आजोबाजवळ वास्तव्यास होती. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली. याचवेळी नात्याने मामा असलेला (आत्याचा पती) हिराजी मोतीराम फुलवारे (रा.मुरूम ता.घनसावंगी जि.जालना) हा शाळेत आला. शिक्षकांशी खोटे बोलून वर्षाला तुला नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे सांगून शाळेतून घेऊन गेला. खामगाव परिसरात पाण्याची सोय असल्याने सर्वत्र उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. याच उसात तो वर्षाला घेऊन गेला. इकडे नातेवाईक वर्षाचा सर्वत्र शोध घेत होते, परंतु ती मिळाली नाही. त्यांनी गेवराई पोलीस ठाणे गाठले आणि कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्वता: तपासासाठी बाहेर पडले. चौकशी केली असता हिराजी वर्षाला घेऊन गेल्याचे समजले. हिराजी हा दारुड्या असल्याने नातेवाईकांना चिंता होती. आपल्या चिमुकलीसोबत काही अनर्थ तर होणार नाही, या काळजीने ते घायाळ झाले होते.
दुस-या बाजूला नात्याने मामा असणा-याच हिराजीने वर्षाला पळवून नेल्याने आणि तिचे वय अवघे सहा वर्ष असल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान आहेर यांच्यासमोर होते. सुरुवातीला त्यांनी गावात चौकशी केली. त्यानंतर एका खब-यामार्फत त्यांना वर्षाला उसात नेल्याचे समजले. पोलीसही घाबरले. दूरवर सर्वत्र उसच दिसत असल्याने त्यांना सापडणे मुश्कील पण अशक्य नव्हते. त्यातच तो चिमुकलीस काही करणार तर नाही ना? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
आहेर यांनी तत्काळ पोलिसांची फौज मागविली. नातेवाईकांनाही सोबत घेतले, परंतु यश आले नाही. रात्री सात वाजेच्या सुमारास आहेर यांना एका कोप-यात ऊस हलल्याचे दिसले. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता हिराजीने वर्षाला डांबून ठेवल्याचे दिसले. त्यांनी चतुराईने हिराजीच्या तावडीतून वर्षाची सुटका केली. अवघ्या दहा तासात तपास लावल्याने गेवराई पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या टिमने केली.
अन् वर्षा धायमोेकलून रडली...
दिनेश आहेर यांनी वर्षाला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन केले. आपले कुटुंबीय दिसताच वर्षाने आजीकडे धाव घेतली आणि तिच्या कुशीत जाऊन धायमोकलून रडू लागली. यावेळी इतर नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले. वर्षा परत आल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.
पोलिसांची यशस्वी कामगिरी
दिवसभर शोधल्यानंतरही वर्षा आणि हिराजी मिळत नव्हते. सापडावे तर कोठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. परंतु पोलिसांनी माघार घेतली नाही. अंधार पडेपर्यंत हिराजीचा शोध घेतला. यामध्ये त्यांना यश आले. पोलिसांचा आवाज शांत झाल्याचे समजताच हिराजी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही पोलिसांची ह्यचालह्ण होती, हे त्याला बेड्या ठोकल्यावर समजले.