बीडमध्ये क्षयरोग, कुष्ठरूग्ण शोध अभियानावर आशा, एनएचएम कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 02:43 PM2019-09-19T14:43:42+5:302019-09-19T14:45:59+5:30
पाच दिवसात दोन लाखाऐवजी केवळ २५ हजार घरांचेच झाले सर्वेक्षण
बीड : आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग व कुष्ठरूग्ण अभियान राबविले जात आहे. पाच दिवसात जवळपास १ लाख ९२ हजार ६०० घरांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, आशा सेविका व एनएचएम कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांत केवळ २५ हजार १६ घरांचाच सर्वे झाला आहे. आता येणाऱ्या ९ दिवसात उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
१३ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र क्षयरोग व कुष्ठरूग्ण शोध अभियान राबविले जात आहे. यासाठी बीड आरोग्य विभागाने प्रशिक्षण, बैठका घेऊन नियोजन केले. आशा सेविका, एनएचएम कर्मचाऱ्यांना कामाचे मार्गदर्शन केले. मात्र, सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच अशासेविका विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या. त्यापाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही गेले. तीन दिवस झाले तरी त्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. आशांचा संप मिटल्याचे सांगण्यात आले असून गुरूवारपासून त्या सर्वेक्षणाला सुरूवात करणार आहेत. बुधवारी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता या अभियानाला गती येऊ शकते.
दरम्यान, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे यांनी याच सर्वेक्षणासाठी पाटोदा तालुका पिंजुन काढल्याचे सूत्रांकडून समजते.
एका आशाला दररोज २० घरांचे उद्दीष्ट
ग्रामीणमध्ये १०० तर शहरात ३० टक्के उद्दीष्टपूर्तीसाठी एका आशाला रोज २० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यादृष्टीने पाच दिवसात १ लाख ९२ हजार ६०० घरांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ २५ हजार घरांचा सर्वे झाला आहे.
एक नजर आकडेवारीवर
भेट दिलेले घरे - २५ हजार १६
लोकसंख्या - १ लाख ९ हजार ५९४
कुष्ठरूग्ण संशयीत - २१५
नवीन रूग्ण - ३
क्षयरोग संशयीत - २२३
नवीन रूग्ण - ३