तुकोबाराय वर्तमानात जगायला शिकवतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:56+5:302021-02-06T05:01:56+5:30
बीड : बहुसंख्य लोक, बहुसंख्य मान्यता एकतर भूतकाळात रमतात किंवा भविष्यकाळात रमतात. परंतु जगद्गुरु तुकोबाराय हे वर्तमानात जगायला शिकवतात. ...
बीड : बहुसंख्य लोक, बहुसंख्य मान्यता एकतर भूतकाळात रमतात किंवा भविष्यकाळात रमतात. परंतु जगद्गुरु तुकोबाराय हे वर्तमानात जगायला शिकवतात. जन्मापूर्वी मी कुठे होतो?, मेल्यावर कुठे असेन ? या गोष्टीला कवडीची किंमत नसून वर्तमान जीवन कसे जगता ? ही बाब महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जगद्गुरू तुकोबाराय सेवापीठाचे संस्थापक परशुराम महाराज मराडे यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष, बीडच्यावतीने स. मा. गर्गे वाचनालय येथे आयोजित ‘तुकोबाराय जन्मोत्सव’सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रामायणाचार्य नाना महाराज कदम, भगवताचार्य माधव महाराज डाके, मुक्तीराम महाराज खांडे, सुरेश महाराज जाधव, सुसेन महाराज नाईकवाडे, नितीन महाराज पिसाळ, रामेश्वर महाराज जाधव, प्रतिभा गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रतिमा पूजनानंतर जिजाऊ वंदना झाली. मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे अध्यक्ष संतोष डोंगरे यांनी प्रास्ताविक केले.
‘संसारी जीवन जगायला उपयुक्त तुकाराम’ या विषयावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी आदिनाथ काटकर, प्रवक्तेपदी ज्ञानेश्वर कोटुळे यांची तर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्तेपदी प्रतिमा जरांगे यांची नियुक्ती करण्यात आली. अशोक ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व वारकरी कीर्तनकारांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी व्याख्याते बापूसाहेब शिंदे, संदीप कदम, जनार्दन शिंदे, आचार्य सुधाकर शिंदे, नितीन मातकर, राकेश शिंदे, धनंजय शेंडगे, प्रभाकर उंबरे, सुधाकर राठोड तसेच बीड शहरातील वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे बीड तालुकाध्यक्ष संतोष माने, नारायण गवते, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा वर्षा माने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण महाराज उबाळे यांनी केले. तुकोबारायांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.