दहा महिन्यांनंतर शाळांमध्ये किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:44+5:302021-02-05T08:29:44+5:30
बीड : शासनाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट झाला. दहा महिन्यानंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला. ...
बीड : शासनाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट झाला. दहा महिन्यानंतर शाळेत आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला. परंतु कोरोनाचे भय अद्यापही कमी झाले नसल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थी जिल्ह्यातील शाळांमध्ये उपस्थित होते. यावरून कोरोनाचे भय पालकांच्या मनातून अद्यापही कमी झाले नसल्याचे दिसून आले. बहुतांश शाळांतील शिक्षकांची कोविड चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यास अडचणी होत्या. १ फेब्रुवारीनंतर शाळांमध्ये उपस्थिती वाढेल असा अंदाज शिक्षकांना आहे. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. दोन महिन्यात या वर्गांमध्ये विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण साधारण ४५ टक्के होते. तर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी उपस्थितीचे प्रमाण ४० ते ४५ टक्के होते.
---
शाळेत आल्यानंतर खूप छान वाटले. मास्क लावून आलो होतो. टेम्परेचर तपासले. एका बेंचवर एक विद्यार्थी होता. वर्गात शिक्षकांनी नियम सांगितले. शाळेत रोज येणार आहे.
-- अमर विजय इंगळे, विद्यार्थी
---
पहिला दिवस आनंदाचा होता. मैत्रिणी भेटल्या. ऑनलाइनपेक्षा फेस टू फेस बोलता येत असल्याने शाळेत शिकवलेले समजते. शाळेत आज गणित, विज्ञान शिकविले. - श्रेया केदारनाथ राऊत, विद्यार्थिनी
--------
अनेक दिवसानंतर शाळेत आल्यावर चांगले वाटले. सर जे शिकवतात ते समजते. प्रथम सत्रापर्यंत ऑनलाईन शिकलो, आता रोज शाळेत येणार असून परीक्षेसाठी तयारी करणार आहे. - वैभव सदाशिवराव दराडे, विद्यार्थी
----------
शाळेत आल्याने बरे वाटले. आतापर्यंत घरी ऑनलाईन अभ्यास करत होते. आईला घरकामात मदत करत होते. मास्क लावून शाळेत गेले, तपासणी केली. त्यामुळे सुरक्षित वाटले. - वृषाली विष्णू जोगदंड, विद्यार्थिनी
----------
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष ज्ञानार्जन करून मुख्य प्रवाहात येतील. त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून निघणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता, परंत काही पालक साशंक आहेत. - नितीन येळवे, शिक्षक, शिवाजी विद्यालय.
----
कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास उशीर झाला. विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसणे, नेटवर्कमुळे ऑनलाईनमध्ये अनेक समस्या होत्या. शाळा पूर्ववत सुरू झाल्याने शिक्षक- विद्यार्थ्यांचा संवाद, संपर्क राहील. विद्यार्थी उत्साही दिसून आले. पालकांचे शंका समाधान केले. -निलेश मालपाणी, शिक्षक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय.
------------
पहिल्या दिवशी उपस्थिती
विद्यार्थी ९२ हजार ४९१
शिक्षक ३४००
शाळा सुरू १०००
----
शिक्षकांची कोविड चाचणी ३४७३
पॉझिटिव्ह शिक्षक ५३