परळी तालुक्यात बारा गावांना पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:10+5:302021-05-09T04:35:10+5:30
संजय खाकरे लोकमत न्यूज नेटवर्क परळी : तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. ...
संजय खाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. १२ ग्रामपंचायतींच्या वतीने विंधन विहीर व विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव परळी पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
सध्या काही गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. परळी तालुक्यातील रेवली, गाढे पिंपळगाव, लिंबुटा, कन्हेरवाडी, इंदपवाडी, जिरेवाडी , खोडवा सावरगाव, वानटाकळी तांडा, मलनाथपूर, गडदेवाडी, इंजेगाव, करेवाडी या गावांतील ग्रामपंचायतीने विहीर व विंधन विहीर अधिग्रहण केल्या आहेत. अशा स्वरूपाचा प्रस्ताव या गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी परळी पंचायत समितीकडे सादर केला आहे.
वाण धरणातील पाणी नदीपात्रात सोडा
वाण धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु नागापूर, लिंबोटा, नाथ्रा, बहादुरवाडी, पांगरी, दे. टाकळी, सबदराबाद, तडोळी, वडखेल, तळेगाव वरील शिवारात सध्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सध्या येथे टंचाई असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे विहिरी आटल्या आहेत. हेच पाणी नदीपात्रात सोडल्यास १५ पेक्षा अधिक गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे भाजपचे नेते फुलचंद कराड यांनी सांगितले.
....
रेवली येथे महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गावातील एक विंधन विहिरीचे अधिग्रहण केले आहे. तांड्यावर ही विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहीत करण्यात आलेल्या बोअरचे पाणी पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत टाकण्यात येत आहे. टाकीतील पाणी ग्रामस्थांना पुरविण्यात येत आहे.
-रेखा केदार, सरपंच, रेवली.
...
परळी तालुक्यातील बारा गावांत बोअर अधिग्रहण करण्यात आल्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आला आहे.
-संजय केंद्रे, गटविकास अधिकारी, परळी.
...