सणाच्या पूर्वसंध्येलाच चोरांच्या हाती 'लक्ष्मी'; भरदिवसा घर फोडून अडीच लाख लांबविले
By संजय तिपाले | Published: September 4, 2022 02:59 PM2022-09-04T14:59:44+5:302022-09-04T14:59:53+5:30
साक्षाळपिंप्रीची घटना
बीड: आई - वडील हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला तर पती- पत्नी कापूस फवारणीला शेतात गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. गौराई सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने साक्षाळपिंप्री (ता.बीड) येथे खळबळ उडाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, उध्दव रंगनाथ हिंगे (वय ३३) हे साक्षाळपिंप्री येथे कुटुंबीयासह राहतात. श्री क्षेत्र नारायणगड रस्त्यावर त्यांचे घर आहे. ते शेतीसोबत गावात कापड दुकान चालवितात. ३ सप्टेंबर रोजी त्यांचे आई - वडील हरिनाम सप्ताह कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते तर उध्दव हे पत्नीसमवेत शेतात कापूस फवारणीला गेले होते.
दुपारी १ ते सायंकाळी पाच या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट उचकटून सोनसाखळी, झुंबर, गंठण, नथनी, अंगठी, नेकलेस व रोख एक लाख रुपये असा एकूण दोन लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. उध्दव हिंगे यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास उपनिरीक्षक पवन राजपूत करत आहेेत.
पथकांच्या भेटी
घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ पाचारण केले होते. यावेळी श्वान घराभोवती घुटमळले. उपअधीक्षक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी भेट देत पाहणी केली.