मुलींच्या जिल्हा परिषद शाळेत निघाला दोन पोते दारूच्या बाटल्यांचा कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 06:12 PM2019-06-17T18:12:10+5:302019-06-17T18:12:47+5:30
४५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर आज शाळा सुरु झाल्या
अंबाजोगाई (बीड ) : जिल्हा परीषदे शाळेसंबंधी अनास्था असलेले अनेक किस्से आपण सतत ऐकतो. आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु झाल्या. शाळा सुरु करण्यापुर्वी शिक्षकांनी परीसराची स्वच्छता केली असता त्यांना परीसरात दोन पोती दारुच्या बाटल्या आणि कंडोम चा कचरा उचलावा लागला. ही घटना ग्रामीण भागातील कोण्या शाळेतील नाही तर शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील मुलींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे हे विशेष.
४५ दिवसांच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर आज १७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरु झाल्या. शाळेचा पहिला दिवशी येथील जिल्हा परीषदेच्या मुलींच्या शाळेतील शिक्षकांनी परीसर स्वच्छतेचा उपक्रम हाती घेवून केला. मुलींच्या शाळेतील परीसराची स्वच्छता करतांना या शिक्षकांना दोन पोती दारुच्या बाटल्या आणि कंडोम चा कचरा उचलावा लागला. वास्तविक जिल्हा परीषदेच्या शाळांसह सर्व शाळा उन्हाळ्यात ही तशा चालुच असतात. शाळेतील मुख्याध्यापक, लिपीक आणि सेवक या कर्मचाऱ्यांना या सुट्या नसतात. तेंव्हा या तीनही पदावर कर्मचाऱ्यांची रेलचेल असतानाही शाळेच्या परीसरात दारुच्या बाटल्यांचा आणि कंडोमचा कचरा सापडावा हे अतिशय चिंताजनक आहे.