घरफोडी करणारे दोन चोरटे ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:59+5:302021-09-05T04:37:59+5:30
कडा : भरदिवसा घरफोडी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना धामणगावजवळील झिंजुर्के वस्तीजवळ ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. ४ ...
कडा : भरदिवसा घरफोडी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना धामणगावजवळील झिंजुर्के वस्तीजवळ ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. ४ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.
धामणगाव येथील झिंजुर्के वस्तीवरील महादेव झिंजुर्के हे शेतात गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा तोडून सोने, रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांना ही कुणकुण लागली. दोन चोरट्यांचा लोकांनी पाठलाग सुरू केला. चोर पुढे व ग्रामस्थ मागे असा खेळ रंगला. अखेर दोघांना पकडण्यात यश आले. त्यांना चोप देत ग्रामस्थांनी अंभोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य एक दुचाकी घेऊन पसार झाला. विनायक मश्रीलाल चव्हाण (१९), शायद तान्हाजी चव्हाण (१९, दोघेही रा. पिंपरखेड, ता. आष्टी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. अंभोरा ठाण्याचे सहायक निरीक्षक रोहित बेंबरे, पोलीस नाईक प्रल्हाद देवडे, कल्याण राठोड यांनी गावात धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. मयूर महादेव झिंजुर्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.