बीडमध्ये दोन केंद्रसंचालक तडकाफडकी हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:36 PM2018-03-06T23:36:53+5:302018-03-06T23:38:51+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच्या कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आले आहे.
मंगळवारी बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा होती. शिरुर कासार येथील कालिकादेवी विद्यालय परीक्षा केंद्रावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने तपासणी केली असता कॉपी बाळगणाºया १५ विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर बीड तालुक्यातील चौसाळा येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर उपशिक्षणाधिकारी नजमा यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला भरारी पथकाने ३ परीक्षार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई केली.
मुख्याध्यापकांवरही कारवाईची टांगती तलवार
शिरुर कसार येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर पाहणीदरम्यान दहावीसाठी एस. बी. सानप तर बारावीसाठी पी. आर. सिरसाट हे केंद्रसंचालक शिक्षक असल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ परीक्षेच्या कामकाजातून कमी केले. मुख्याध्यापक हे केंद्र संचालक नसल्याने परीक्षा केंद्रावर पुरेसे नियंत्रण राहू शकत नाही, असे असताना हे काम टाळणाºया मुख्याध्यापक व्ही. जी. काटे यांची केंद्रसंचालक म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली. ही कार्यवाही माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सोनवणे यांनी केली.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीतही परीक्षा केंद्र संचालक हे मुख्याध्यापक असावेत अशा सूचना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केल्या होत्या.
शिरुर येथील कारवाईनंतर इतर केंद्रांचे संचालक शिक्षक आहेत की, मुख्याध्यापक याची तपासणी सुरु झाली असून केंद्र संचालक पद टाळणाºया मुख्याध्यापकांवरही कारवाईची शक्यता आहे.
महिला पथकाने खाते उघडले
बारावीच्या परीक्षा अंतीम टप्प्यात आहे. या कालावधीत होणा-या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी नियुक्त महिला विशेष आणि बैठे पथक यांनी कार्यवाही केली नसल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मंगळवारी चौसाळा येथे तीन परीक्षार्थ्यांवर कारवाई झाली.