कुख्यात गुंड खोक्या भोसलेला मदत भोवली; चकलांब्याचे दोन पोलिस निलंबित
By सोमनाथ खताळ | Updated: March 25, 2025 11:47 IST2025-03-25T11:46:09+5:302025-03-25T11:47:19+5:30
कारागृहात जाण्यापूर्वी खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत होता. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत होते.

कुख्यात गुंड खोक्या भोसलेला मदत भोवली; चकलांब्याचे दोन पोलिस निलंबित
बीड : आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला कारागृह परिसरात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे समोर आले होते. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला होता. याचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चकलांबा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. तसेच ठाणेदारालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे अशी निलंबीत केेलेल्या पोलिसांची नावे आहेत.
शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश ऊर्फ खोक्या भोसले याने बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. तसेच बावी येथील ढाकणे बापलेकाला मारहाण करून दात पाडले होते. याप्रकरणी खोक्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. सोबतच वनविभागाच्या धाडीतही त्याच्या घरात वाळलेले मांस सापडल्याने वेगळा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, कारागृहात जाण्यापूर्वी खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत होता. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत होते. सोबतच खोक्याला बोलण्यासाठी मोबाईलही दिला होता. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होते. व त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले होते. याचीच गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.
नोटीस बजावली
अशाप्रकारचे गंभीर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चंकलांबा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. तर प्रभारी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड