पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये दोन दिवस थोडी ढील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:35+5:302021-05-09T04:35:35+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपायांतर्गत जिल्हा प्रशासनाने शनिवार ८ पासून १२ मेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ...
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपायांतर्गत जिल्हा प्रशासनाने शनिवार ८ पासून १२ मेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित पूर्णत: बंदचे आदेश शुक्रवारी दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता प्रशासनाने ११ व १२ मे रोजी तीन तासांची ढील देत, सुधारित आदेश काढला.
या आदेशानुसार, आता ११ व १२ मे रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, सुकामेवा, मिठाईची दुकाने, डेअरी, चिकन, मटन विक्रीची दुकाने व बेकरी संबंधित दुकाने सकाळी ७ ते १० या वेळेत चालू राहतील, तसेच ८ ते १२ मे दरम्यान प्रत्येक दिवशी केवळ पायदळ, गाडीवर, हातगाड्यांवर फिरून दूध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री सायंकाळी ५ ते ७ या वेळेत करता येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने लागू केलेला ८ ते १२ मेपर्यंतचा कडक लॉकडाऊन हा रमजानचे रोजेदार आणि व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून, हा आदेश मागे घेऊन १० मेपासून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ रमजान ईदकरिता कडक निर्बंधांसह सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शेख शफिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
कमी अवधीमुळे गर्दीची शक्यता
रमजान ईद १४ मे रोजी साजरी होण्याची शक्यता आहे. शनिवारी प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात ११ व १२ मे रोजी प्रत्येक दिवशी केवळ तीन तासांची सूट दिली आहे. ५ ते ७ व त्यानंतर वाढविलेला ८, ९ आणि १० मेपर्यंतचा कडक लॉकडाऊन, यामुळे सवलत देण्यात येणाऱ्या दोन दिवसांत खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला उपाय आणि नागरिकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
----
जिल्ह्यातील कृषी आस्थापनांना लॉकडाऊनमध्ये खते, बी-बियाणे आणि कृषीविषयक औषधे यांच्या वाहतुकीच्या बाबतीत ८ ते १२ मे या कालावधीत प्रशासनाने परवानगी दिली, तसेच बँकेमध्ये त्यांना सकाळी १० ते १२ या वेळेत आर्थिक व्यवहारासाठी परवानगी दिली. जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण कासट यांच्या निवेदनानंतर शुक्रवारी रात्री प्रशासनाने ही परवानगी दिली.