तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 08:19 AM2022-09-25T08:19:51+5:302022-09-25T08:20:22+5:30
मृतांमध्ये आरोग्य सेवक, उपसरपंचाचा समावेश आहे
- नितीन कांबळे
कडा ( बीड): नवरात्रोत्सवाच्यानिमित्त सांगवी पाटण येथे तुळजापूरच्या देवीची ज्योत आणण्याची प्रथा आहे. यासाठी गावातील ५० तरुण भाविक तुळजापूर येथे शनिवारी सकाळी निघाले होते. यातील एका दुचाकीला शनिवारी रात्री येरमाळा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील तरूण दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करतात. यासाठी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्याची प्रथा आहे. सोमवारी घटस्थापना असल्याने गावातील ५० तरूण भाविक शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकी, टेम्पो, पिकअप अशा वाहनातून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. या भाविकांमधील महेश भोसले ( ३१ ), अमोल खिलारे (३८ ) हे दोघेजण दुचाकीवर निघाले होते.
दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.