परळीत सेप्टिक टँकमध्ये बुडून दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:50 PM2019-01-24T12:50:57+5:302019-01-24T12:56:33+5:30
शिवाजीनगर येथील थर्मल भागात सेप्टिक टँकची दुरुस्ती सुरु होती.
परळी (बीड) : शिवाजीनगर येथील थर्मल भागात सेप्टिक टँकची दुरुस्ती करतांना दोघा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.यासोबतच त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे तीन साथीदार यात गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विशाल शिवाजीराव लांडगे (20) व अर्जुन रमेश भालेराव (19) असे मृतांची नावे असून ते साठेनगर भागात राहत. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर येथील थर्मल भागात माणिक पोपलघट यांच्या घरातील सेप्टिक टँकच्या दुरुस्तीचे बुधवारी मध्यरात्री काम सुरु होते. यात नगर पालिकेचे कंत्राटी कामगार शिवाजी यादव लांडगे तर विशाल रमेश भालेराव, कार्तिक भीमराव कांबळे, विशाल शिवाजी लांडगे व अर्जुन रमेश भालेराव या खाजगी कामगारांचा सहभाग होता.
दुरुस्तीचे काम सुरु असताना रात्री १ वाजेच्या सुमारास विशाल व अर्जुन हे पाय घसरून टँकमध्ये पडले. आतील दुर्गंधीयुक्त पाण्यात ते बुडाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, इतर तिघांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. आज सकाळी ही घटना कळताच शिवाजीनगर भागातील नागरिकांनी मृत व जखमींना बाहेर काढून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती नगरसेवक किशोर पारधे यांनी दिली आहे.