२० कोटींच्या घोटाळ्यातील ‘परिवर्तन अर्बन’चे दोन संचालक गजाआड; चार वर्षांपासून होते फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 19:20 IST2022-07-14T19:20:00+5:302022-07-14T19:20:17+5:30
परिवर्तन अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्यानंतर अचानकच गाशा गुंडाळला.

२० कोटींच्या घोटाळ्यातील ‘परिवर्तन अर्बन’चे दोन संचालक गजाआड; चार वर्षांपासून होते फरार
बीड : माजलगाव येथील परिवर्तन अर्बन मल्टिस्टेटच्या २० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील दोन फरार संचालकांना अटक करण्यात १२ जुलैला आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. ते चार वर्षांपासून तपास यंत्रणेला गुंगारा देत होते. उद्धव सीताराम जाधव (रा. समता कॉलनी, माजलगाव) व महेंद्र विठ्ठल टाकणखार (रा. पंचशीलनगर, माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
परिवर्तन अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा केल्या. त्यानंतर अचानकच गाशा गुंडाळला. २०१८ मध्ये चेअरमन विजय ऊर्फ भारत अलझेंडेसह २७ संचालक व अधिकारी- कर्मचाऱ्यांवर तब्बल ११ गुन्हे नोंद झाले होते. हा घोटाळा २० कोटींच्या घरात आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने १२ जुलैला अटक केलेले दोन्ही संचालक ८ गुन्ह्यांत आरोपी आहेत. दरम्यान, आष्टी येथे २०१८ मध्ये गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून ते दोघे फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सुजित बडे, पो.कॉ.भाऊसाहेब चव्हाण, राजू पठाण,संजय पवार यांनी त्यांना अटक केली. १३ जुलैला त्या दोघांना बीडच्या सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.
एमपीआयडी प्रस्ताव प्रलंबित
परिवर्तन मल्टिस्टेटने बीडसह परभणी, पुण्यात जाळे विणले होते. अल्पावधीत १८ शाखा उघडल्या होत्या. मात्र, अचानक सर्व शाखांना टाळे लागल्याने ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. तथापि, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाल्यावर महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ (एमपीआयडी )प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून प्राधिकृत अधिकारी नियुक्त केल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सांगितले.