बाजारपेठेतील जागेच्या वादातून परळीत दोन गटात राडा; ३० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 01:23 PM2024-01-15T13:23:22+5:302024-01-15T13:23:32+5:30
दुकानात घुसून गोंधळ, चौकात वाहनांवर हल्ला
परळी :शहरातील मोंढा विभागात मकर संक्रातीसाठी सुगडे विकण्यास बसलेल्या उद्धव कुंभार यास जागेच्या कारणावरून मोंढयातील फळ विक्रेत्यांच्या गटाने रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास जबर मारहाण केली.मध्यस्थी करण्यास गेलेल्यांना देखील मारहाण झाल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी 30 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळास रात्री बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,आंबेजोगाई च्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिडके मॅडम अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी भेटी दिल्या आहेत. .
मकरसक्रांतीनिमित्त येथील राणी लक्ष्मीबाई टावर ते मोंढा मार्केट दरम्यान रस्त्यावर फळ विक्रेते व इतर वाण विक्रीचे गाडे लावण्यात आले आहेत. उद्धव कुंभार हा रविवारी दुपारी मोंढा भागात सुगडे विकण्यासाठी बसला.तेथे बसण्यास फळ विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे उद्धव हा भांड्याचे व्यापारी शाम वानरे यांच्या दुकानाजवळ येवून बसला. दरम्यान, रविवारी रात्री 8.30 वाजता फळ विक्रेत्यांच्या एका गटाने कुंभार यांना मारहाण केली. यावेळी वानरे यांच्या भांड्याच्या दुकानातही गोंधळ घातला . त्यामुळे वातावरण तणावाचे झाले.
याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 30 लोकांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धिंगाणा घालणाऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती परळी शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दिली.
दोन गटाचा तूफान राडा
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात महिलांची गर्दी असतानाच अचानक काही लोकांनी दुकानात घुसून एकास जबर मारहाण केली. यावेळी सोडवासोडवी करण्यास गेलेल्यासही या जबर मारहाण केली. याबाबत काहींनी पोलीसात तक्रार करण्यास गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. यामुळे बराच गोंधळ झाला. दरम्यान याचवेळी एक गट हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दुसर्या गटाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. याचवेळी नेहरू चौक भागातील वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडू लागले.
पोलिसांनी शहरात वाहने फिरवून शांततेचे आवाहन केले.
पोलिसांनी अथक प्रयत्न करून प्रकरणावर नियंत्रण ठेवले.रविवारी रात्री यांनी उद्धव कुंभार यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून 15 जणा वीरोधात तर पोलिसांच्या फिर्यादी वरून 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता शहरात शांतता आहे.