बीड जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविली जीवयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 06:52 PM2019-02-22T18:52:26+5:302019-02-22T18:54:15+5:30
कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
बीड/पाटोदा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी जीनयात्रा संपविल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
मच्छिंद्र ज्ञानोबा वीर (४० रा. पाटोदा) या शेतकऱ्यास केवळ दोन एकर जमीन आहे. नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना शेतीसह आधार म्हणून हमाली करण्याचा व्यवसाय ते करत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी उसनवारी करत मोठ्या मुलीचे लग्न केले. लहरी निसर्गाने धोका दिल्याने शेतात पिके आली नाहीत, त्यामुळे केलेली उसनवारी आणि कर्ज फिटले नाही. गुरुवारी बाजार असल्याने हमालीमधून चांगले पैसे मिळतील या आशेने ते बाजारात गेले. मात्र केवळ १०० रूपये मिळाले. अशा परिस्थितीत दुसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे, याची चिंता त्यांना होती. याच नैराश्यातून त्यांनी गळफास घेत गुरूवारी सायंकाळी जीवनयात्रा संपविली. लखन वीर यांच्या खबरीवरून पाटोदा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
दुसरी घटना बीड तालुक्यातील सुर्डीथोट येथे घडली. युवराज अभिमन्यू थोटे (२८ रा.सुडीर्थोट ता.बीड) या तरूण शेतकऱ्यास चार एकर जमीन आहे. घरात आई-वडिल,पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे. युवराज यांनी शेतीसाठी गावातील सेवा सोसायटीकडून दीड लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वडवणी शाखेतून २५ हजाराचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे युवराज हा नैराश्यात होता. गुरुवारी सायंकाळी तो शेतात गेला होता. त्या ठिकाणी त्याने विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार चुलत भाऊ कैलास थोटे यांना कळाल्यानंतर त्यांनी व काही ग्रामस्थांनी तातडीने शेतात धाव घेवून युवराजला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषीत केले. दरम्यान कैलास थोटे यांच्या खबरेवरुन जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत याप्रकरणी नोंद करण्यात आली.